This is my new post in Marathi,about why I write consistently on Dalit-Bahujan Feminism?
As soon as possible I will translate it in English
मी सातत्याने दलित-बहुजन स्त्रीवादावर का लिहिते?
लता प्रतिभा मधुकर
पुरोगामी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता व अभ्यासक असलेल्या माझ्या एका मित्राने त्याच्या माझ्या लेखावरील प्रतिक्रियेत एक वाक्य लिहिले. ‘दलित-बहुजन स्त्रीवादाबद्दल मी सजग नाही,” हे त्याचे विधान मला थोडे चक्रावून गेले.
पण हे अनेक पुरोगामी स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांबद्दल आहे, हे नंतर थोडा विचार केल्यावर जाणवले.
मला सुद्धा कुठे सर्व वर्गीय लढे व मार्क्स, लेनिन, माओ वा त्रोतस्की वा ग्रामची बद्दल सर्व गोष्टी व त्यांच्या सिद्धान्तनातील सर्व टप्पे माहिती आहेत?.
दलित-बहुजन स्त्रीवाद खूप लोकांना माहिती नसण्याचे एक कारण असे जाणवले की दलित, आदिवासी व बहुजन (ओबीसी) चळवळ ब्राह्मणवादाच्या विरोधात उभी राहते, ते आपण आपसूक स्वीकारतो, पण दलित-बहुजन स्त्रियांची स्वतंत्र चळवळ मात्र सहजपणे स्वीकारली जात नाही. तिला व्यापक स्त्री चळवळीचा भाग मानला जातो, किंवा तिला मुख्य प्रवाहापासून वेगळे मानले जाते व ती मुख्य प्रवाह म्हणून स्वीकारली जात नाही.
तसेच अनेकदा दलित- बहुजन स्त्रियांचे प्रश्न, भूमिका या इतर उच्चवर्णीय स्त्रियांप्रमाणेच फक्त पितृसत्तेतून व वर्गसंघर्षातून निर्माण झाले आहेत असे मानले जाते.
त्यामुळे सर्व भारतीय स्त्रियां एकाच प्रकारच्या शोषणाला सामोरे जातात, ही एक प्रस्थापित लोकप्रिय पुरोगामी वैचारिक बैठक (सिद्धांत) अजूनही सर्वमान्य आहे.
पण स्त्रियांमधील ही धार्मिक, जातीय फरक विविधतेतून आले नसून ते विषमतेतून व भेद्भावातून आले आहेत व त्यातही उच्च जातीतील स्त्रियांनी उच्च जातीतील पुरुषांप्रमाणेच स्वत:चे नेतृत्व अबाधित ठेवण्यासाठी दलित-बहुजन स्त्रियांना व त्यांच्या कर्तृत्वाला एकूणच नाकारले आहे, हे वास्तव स्वीकारणे अनेकाना कठीण जाते. .एव्हढेच नव्हे तर उच्चवर्णीय स्त्रियां आपण शुद्रातच गणले जातो व जात होतो, हे विसरून गेल्या आहेत. आपल्यासाठी बहुजन व दलित स्त्रियांनी प्रथम मुक्तीचे, शिक्षणाचे, स्व सन्मानाचे प्रयत्न केलेत , हे त्या विसरतात. विशेषत: ब्राह्मण व उच्चवर्णीय स्त्रियांना ब्राह्मणवादी पितृसत्तेनी केलेल्या शोषणातून मुक्त करण्यासाठी घेतलेला सावित्रीबाई, ताराबाई, तानुबाई, डॉक्टर रुखमाबाई, फातिमा शेख, रुकैय्या या सारख्या अब्राह्मणी/ बहुजन स्त्रीयांना आजच्या स्त्री चळवळीला विसर पडला आहे. आजच्या उच्चवर्णीय स्त्रीवादी या स्त्रीयांना अभिवादन करतात, पण त्यांनी ब्राह्मण स्त्री ला मुक्त केले असे म्हणण्यास मात्र अपवादानेच एखादीच पुढे येते.
दलित-बहुजन स्त्रियांनी १९ व्या शतकात स्त्रीवादी चळवळीचा, स्त्री शिक्षणाचा, कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध आश्रय गृह , प्रतिबंध गृह क्काढणे इत्यादी अनेक गोष्टींचा पाया रचला मग त्यांच्या वारस कशा तयार झाल्या नाहीत ? त्या अचानक कशा गायब झाल्या ? की त्याना नंतर नोक-या देण्यातच आल्या नाही? त्यांचे नेतृत्व अमान्य करून सर्व श्रेय स्वत;कडे घेण्याचा जो एक ब्राह्मणवादी स्त्रीवादी अट्टाहास आहे, व दलित-बहुजन स्त्रियांना वंचित करण्यासाठीचे फक्त, वर्गीय व पितृसात्तात्मक आकलन त्यांनी ठेवले आहे, त्याला आव्हान करण्याशिवाय आता पर्याय नाही.कारण ऐतिहासिक वास्तव वेगळे आहे.
एक मात्र खूपच जमेची बाजू आहे व प्रशंसनीय आहे की स्त्री चळवळ, स्त्रीवाद व स्त्री अध्ययन या तिन्ही स्तरांवर दालीत्य-बहुजन स्त्रीवादावर गेल्या दोन दशकांत मोकळेपणी चर्चा होतेय, होत आली आहे. त्यातून अनेक दलित-बहुजन किंवा अब्राःमानी स्त्रीवादी अभ्यासक व त्यांचे लेखन पुढे आले आहे.
पाश्चात्य देशातील अश्वेत स्त्रीवादी असू देत किंवा मुस्लीम, ख्रिश्चन वा इतर अल्पसंख्यांक धर्मातील स्त्रियांचे कुठल्याही देशातील बहुसंख्यांकांच्या तुलनेत प्रश्न असोत, लैंगिकतेचे किंवा विविध लीन्ग्भावाचे असोत, आज ते जगभरातील स्त्री चळवळीत ऐरणीवर आहेत.
म्हणूनच स्त्री चळवळ एक नसून त्या अनेक चळवळी आहेत, स्त्रीवाद एक नसून अनेक प्रकारचे स्त्रीवाद आहेत ही समज गेल्या दोन दशकांमध्ये प्रामुख्याने स्त्री चळवळीने स्वीकारली. त्यामुळे स्त्रीवादातील अनेक प्रवाहांच्या मुळाशी त्यांचे स्वतंत्र standpoints आहेत हे स्त्री अध्ययन व चळवळीच्या क्षेत्रात मान्य झाले आहे.
मी स्वत: दलित-बहुजन स्त्रीवादाच्या सिद्धान्तनासाठी एका पर्यावरणीय व सही विकासासाठी लढणा-या कार्यकर्त्याच्या नजरेतून जात वास्तवाचे आकलन समोर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात मला फुले-आंबेडकर विचार्धारेशिवाय शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
गांधीजींच्या अहिंसा व शांतीमय सत्याग्रहाचे मुळ सुद्धा बुद्धाच्या धम्म व अहिंसा शांतीमयतेच्या प्रेरणेतून घेतल्याचे दिसून येते. फुले-आंबेडकरी चळवळ आपल्या बुद्ध धम्माचा वारसाच देऊ करते.
डॉक्टर बाबासाहेबांनी केलेले कुठलेही सामाजिक समतेसाठी चे संघर्ष तितकेच शांतीमय व अहिंसक होते, हे मान्य करावेच लागेल. इतिहासकारांनी गांधींच्या राजकीय सत्याग्रहाना अहिंसक म्हणून नोंदवले पण हजारो लोकांचा सहभाग असलेला महाडचा सत्याग्रह,(१९२७), काला राम मंदिर (१९३०) सत्याग्रह सर्वच नि:शस्त्र, अहिंसक व स्त्री- पुरुषांचा बरोबरीने सहभाग असणारे होते, हे मात्र इतिहास लेखकांना दिसलेच नाही. असे कसे? . गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह १९३० व चाले जाव सत्याग्रह १९४२ चा आहे. काल क्रम बघितला तरी आंबेडकरांनी गांधीजींच्या दांडी व मीठ सत्याग्रहा पूर्वी महाडचा सत्याग्रह केला होता हे लक्ष्यात घ्यायला हवे, आजवर इतिहास लिहिणा-यांनी दोन महा मानवांमध्ये स्पर्धा लावून एकाला सर्व श्रेय दिले व दुस-याच्या कर्तृत्वाची दखल पण घेतली नाही.
या व अशा अनेक प्रश्नाना उपस्थित करीत आजवर १९८५ पासून या विषयावर मी केलेले लेखन जसे की 'अब्राह्मणी स्त्रीवादाच्या दिशेने, विद्रोहाची सकल जाणीव, जांभळ्या पहाटेपूर्वी, युगप्रवर्तानाचे साक्षीदार व आताचे गेल्या तीन वर्षातील दलित-बहुजन स्त्रीवाद,जात वास्तव, ओबीसी चळवळ व स्त्रियां या संदर्भातील केलेल्या माझ्या काही लेखांचे संकलन करून ते पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा विचार करतेय.
. तुझ्या प्रतिक्रियेने एक गोष्ट लक्ष्यात आली की परिवर्तनवादी वर्तुळात सुद्धा स्त्री चळवळीतील ही सिद्धान्तनाची वाटचाल अनेकांना माहिती असेल पण त्यामागील चिंतन, भूमिका व सिद्धांताचे प्रयोग कदाचित माहिती नाहीत.
हेच बहुतेक इतर चळवळीत सुद्धा त्यांच्या मुद्द्यांबाबत घडत असेल, पण अनेकजण त्यापासून अनभिज्ञ असू शकतात.
आज कळत नकळत आपल्यासारखे कार्यकर्ते जे लिहिताहेत ते त्या त्या चळवळीच्या प्रत्यक्ष पाया असणा-या तळागाळातील लोक व त्यांच्या standpoints ला जसेच्या तसे समोर ठेवून सिद्धांतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मला वाटते हे खूप महत्वाचे आहे.
तुझ्या मागील लेखात तू म्हटल्याप्रमाणे मला सुद्धा आता हे सर्व लोकांपर्यंत पोचवायचेय. साम्राज्यवाद, चंगळवाद, धर्मांधता, पितृसत्ता व जातीभेद यांना तोंड देण्यासाठी आजवर केलेले वाचन, चिंतन व कार्य पोचवले नाही तर हिंदुत्व वाद्यांच्या संस्कार वर्गाच्या जाळ्यात आजची तरुण पिढी पूर्ण अडकेल व सत्य व सत्यशोधक चळवळी त्यांना माहितीच होणार नाहीत.
आजवर इतक्या वर्षात कार्यकर्ता म्हणून कार्य केले, अभ्यास व संशोधन केले. अनेक प्रशिक्षण दिले, भाषणे केली, व्याख्याने दिलीत, लेखन केले, करतेच आहे पण आता फुले-आंबेडकरवादी, स्त्रीवादी व सही विकासासाठीच्या पर्यावरणीय दृष्टीकोनातून विस्थापित होणा-या शेतकरी, कारागीर, कष्टकरी विशेषत: बहुजन ओबीसी समाजाचे प्रबोधन व जागृती करण्यासाठी मी फिरतेय व फिरायचे ठरवलेय. कारण त्यांनी ब्राह्मणांचे नाही त्यांच्या दलित बंधू भगिनींचे अनुसरण करण्याची वेळ आली आहे. आपला विवेक व प्रज्ञा जागृत करण्याची वेळा आली आहे, हे त्यांना सांगण्याची नितांत गरज आहे. .
जिथे पुरोगाम्यांच्या मंचावर सुद्धा स्त्रियांना फक्त प्रातिनिधिक रुपात बसवले जाते. तिथे माझ्या सारख्या अनेक स्त्री कार्यकर्त्याना मंच मिळावा म्हणून आपल्या चळवळीतील पुरुष कार्यकर्ते नक्की च विचार करतील व आपली खुर्ची/ पक्षीय प्रतिमा उलट या आपल्या चळवळीतील स्त्री सहका-यांमुळे अधिक उज्वल व पक्की होईल असा विश्वास त्यांना वाटला तर दलित-बहुजन चळवळीतील स्त्री कार्यकर्त्या ना आपल्याच समुदायातील पुरुषांच्या पितृसत्तात्मक वागणूकीबद्दल विरोध करण्यात वेळ घालवावा लागणार नाही.
लता प्रतिभा मधुकर
No comments:
Post a Comment