Thursday, April 21, 2016

इतिहासाची साक्ष, फुले-आंबेडकरी विचारधाराच भारतीय स्त्री चळवळीचा मुख्य प्रवाह लता प्रतिभा मधुकर

इतिहासाची  साक्ष,
फुले-आंबेडकरी विचारधाराच भारतीय स्त्री चळवळीचा मुख्य प्रवाह  
लता प्रतिभा मधुकर
(हा लेख मी क्रांतीज्योती या संघटनेच्या आंबेडकर विशेषांकासाठी लिहिला. सध्या पुन्हा एकदा दलित -बहुजन स्त्रीवादाची मीमांसा सुरु झाली आहे. त्या मुळे प्रथम दलित-बहुजन स्त्रीवादाची ऐतिहासिक बैठक वाचकांना कळणे गरजेचे आहे. अर्थातच मी दलित-बहुजन स्त्रीवाद हाच स्त्री चळवळीचा मुख्य प्रवाह आहे, असे मानते व त्याला ऐतिहासिक भक्कम पुरावे आहेत तर काही जेष्ठ स्त्रीवादी अभ्यासक या प्रवाहां कडे अस्मितावादी चळवळ म्हणून बघतात व मुख्य प्रवाहाचे सारे श्रेय  ब्राह्मण व उच्चजातीय स्त्रियांचे  आहे असे मानतात व त्या अनुषंगाने ब्राह्मण स्त्री  हीच मुख्य प्रवाहाची प्रतिनिधी आहे, असे वक्तव्य करतात.
खरेतर वस्तुस्थिती अशी आहे की बहुजन व दलित पुरुष व स्त्रियांच्या (त्या काळातील शुद्रातीशुद्र) पुढाकाराने ब्राह्मण तसेच सर्व जातीतील स्त्रियांच्या मुक्तीचे दार उघडले. एकीकडे फुले-आंबेडकरांचे योगदान या सर्व ज्येष्ठ समीक्षक वादातीत मान्य करतात. पण  जाती व्यवस्थेच्या उतरंडी मधल्या  ब्राह्मणा जातीत वा उच्च जातीत जन्माला आल्याने स्वत:च्या अवकाशातून , स्वत;च्या stand-point मधून त्या नेहमी दलित-बहुजन स्त्रीला ब्राह्मण स्त्रियांनीच हात दिला असून त्याच नेतृत्वात होत्या व त्याच मुख्य प्रवाह आहेत असे गृहीत धरतात.. ज्या क्षणी स्त्री चळवळ सुरु करण्यात या देशातील दलित बहुजन स्त्रीचे नेतृत्व होते असे मानतो, तेव्हाच  ब्राह्मण व उच्चवर्णीय  स्त्रियांनी स्त्रीवादी चळवळीचे नेतृत्व स्वत;कडे कसे खेचून घेतले (इंग्रजीत appropriation कसे केले) याची एक तर्कसंगत वास्तववादी समीक्षा समोर ठेवू शकतो.
जेव्हा काही नामंकित ज्येष्ठ स्त्रीवादी मांडणी करतात तेव्हा सर्वसामान्य स्वीकारू  लागतात की  हो! या देशातील स्त्री चळवळ ब्राह्मण उच्चवर्णीय स्त्रियांनीच  सुरु केली. पण आता त्यांनाही सातत्याने हे वास्तव आग्रहाने मांडावे लागेल की या देशातील ब्राह्मण स्त्री ही फुले-आंबेडकरी  विचारधारा  व (संविधानासाराख्या) कृती मुळेच मुक्तीची वाट चालली.  पण उच्चवर्णीय स्त्री ने हे सर्व ऐतिहासिक योगदान  विसरून १९७५ नंतर  स्वत;;कडे नेतृत्व घेऊन दलित-बहुजन, अल्पसंख्यांक, गरीब, अशा सर्व महिलांना वंचित सदरात  टाकून त्यांना बिचा-यांना आता मुख्य प्रवाहात आणायचे आहे, त्या मुळात अज्ञानी आहेत असे मानायला सुरुवात केली. त्यामुळे स्त्री चळवळीत आघाडीवर असलेल्या दलित-बहुजन स्त्रियांना स्वत:च्या योगादानाकडे व दृष्टीकोन व सिद्धान्तानाकडे विशेष लक्ष्य पुरवावे लागले. 
 स्त्रियांची चळवळ सुद्धा अस्मितादर्शी चळवळ व स्त्री-मुक्तीची चळवळ म्हणून जन्माला आली ती वर्गसंघर्ष व अस्तित्वाच्या मुद्द्यावर  नव्हे तर पितृसत्तेला आव्हान करीत व विशेषत: या देशातील ब्राह्मणवादी पितृसात्तेच्या विरोधात स्त्रीच्या अस्मितेचा, मुक्तीचा जागर करीतच. हा लेख तशा अर्थाने माझ्या भूमिकेचे ऐतिहासिक प्रास्ताविक आहे. पुढील लेखात  दलित-बहुजन स्त्रीवाद सिद्धांतन व समीक्षा वरील सर्व उल्लेखित व आता या लेखात न आलेल्या अनेक स्त्रीवादी सामिक्षाकाम्च्या मतांचा, व आलोचनेचा आढावा घेण्याचा प्रयत्न असेल. )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या  १२५ व्या जयंती निमित्त देशभरात पुन्हा एकदा एक वैचारिक घुसळण चालली आहे. रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येनंतर देशभरातून सर्व धर्मातील परिवर्तनवादी तरुणाईचा आवाज पुन्हा एकदा आझादी मागत उठला आहे. सर्वात महत्वाची घोषणा जी देशात स्त्री चळवळी ने गेली ३० वर्षे प्रत्येक महिला दिनी दिली --- “ मेरी बहना मांगे आझादी, मेरी मां मांगे  आझादी – बलात्कार से, अत्याचार से, पाबंदी से आझादी –“ ही घोषणा भाजपा सरकारने पहिल्यांदाच ऐकल्यासारखे कान टवकारले. कारण ते कधी तळागाळातील कष्टकरी व स्त्री मुक्तीच्या चळवळीशी जुळलेच नव्हते. त्याना ऐकू आले ते शब्द होते मनुवाद से आझादी, धर्मांधता से आझादी... आणि जोशी, भागवत, इराणी पुन्हा एकदा मनुस्मृती लागू करण्याच्या तयारीत होते. सर्व जाहीर सभांमध्ये पुन्हा एकदा सांस्कृतिक व सामाजिक गुलामी आणण्यासाठी लोकांचे कान भरत होते. त्यामुळे त्यांची एका छोट्या घोषणेच्या बुलंद आवाजाने--- ‘आझादी’ ने झोप उडवली.
“या देशातील सामाजिक व सांस्कृतिक गुलामी ही इंग्रजांच्या गुलामी पेक्षा ही शतकानु शतके लादली गेली आहे, व त्या गुलामीत या देशातील स्त्रियां व शुद्रातीशुद्र खितपत पडले आहेत. जेव्हा आपला देश ब्रिटीशांच्या गुलामीतून मुक्त होईल तेव्हा जर पुन्हा एकदा ब्राह्मणवादी प्रवृत्तीचे शासन निवडून आले तर ते स्त्रियां व शुद्रांना मिळू लागलेले स्वातंत्र्य, समानता व न्याय मागण्याचे हक्क  नक्कीच त्तुदावातील. म्हणून सर्व धर्म, भाषा, प्रांत, रंग, जात, लिंग, वर्गातील भारतीय नागरिकांसाठी एक संविधान लिहिले गेले. या संविधानाने या देशातील सर्व शुद्रातीशुद्र जाती व स्त्रियांना माणूस म्हणून व या देशाचे नागरिक म्हणून सर्व अधिकार बहाल केले. बुद्धाच्या सम्यक व शांततावादी शिकवणुकीला गुंडाळून ठेवून सम्राट अशोका नंतर पुन्हा एकदा  पुष्यश्रुंगमित्राने मनुस्मृती जिवंत करून जातीव्यवस्था व पितृसत्ता बळकट केली होती. तेच काम आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुयायी करत आहेत.  या  जातीवादाविरुद्ध आवाज उठविणारी  एक विद्रोही परंपरा बुद्ध, चार्वाक, थेरी गाथेत नमूद केलेल्या ७३ स्त्रियां असू दे किंवा कबीर, रोहिदास, मीरा, सोयरा, चोखा, कान्होपात्रा, मुक्ता, बहिणा व जनाबाई असे बंडखोर  संत असू देत कितीतरी नावे घेता येतील.
१२ व्या शतकापासून सुरु झालेल्या संत परंपरेने महाराष्ट्रात पंढरपुरात समतेचा जागर मांडला होता. कानडी असलेला हा विठू प्रांतवाद व भाषावादाला भिक घालत नव्हता. (आजचे स्वार्थी भाषाभिमानी विठू मराठीच म्हणून भांडू लागले असते, असो)  लोक जाती-पाती विसरून एका काळ्या सावल्ळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ लागले होते. एकत्र खाऊपिऊ लागले होते. स्त्रियां पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडत मुक्तीचे आत्म स्वर आळवू लागल्या होत्या.
त्या भक्ती चळवळीवर पेशव्यांनी बोळा फिरवला आणि या पुण्याच्या  बामण हरींनी पुन्हा एकदा शुद्रातीशुद्र व स्त्रियांच्या वर अन्यायाचा कहर केला. या देशात ब्राह्मणी पडद्याआड लपलेली गुलामगिरी रीतसर सैद्धांतिक व उदाहरणादाखल उजेडात  यायल १९ वे  शतक उजाडावे लागले.  पहिल्यांदाच  शुद्रातीशुद्र व स्त्रियांच्या गुलामगिरी मागील ब्राह्मणवादी षडयंत्र उघड करणारे एक ऐतिहासिक  सत्यशोधन व तत्वज्ञान  महात्मा जोतीराव फुले यांनी १८७३ मध्ये आपल्या गुलामगिरी या ग्रंथात मांडले .
एकीकडे मार्क्स ने अगदी त्याच काळात दास कॅपिटल लिहिले. महात्मा फुले पाश्चात्य देशात जन्माला आले असते तर येथील डाव्या विचारांच्या पुरोगाम्यांनी मार्क्स इतकेच फुले डोक्यावर घेतले असते. त्यांनी ग्रामची या मार्क्सवादी संशोधकाच्या मांडणीवर  subaltern तत्वज्ञान मांडले त्यात जवळपास बंगालमधील उच्चवर्णात जन्मलेले किंवा ब्राह्मण जातीत जन्मलेले ५-६ विचारवंत आहेत. पण दलित-बहुजन तत्वाज्ञानाने मात्र मानवतेची नाळ जोडत मार्क्स-ग्रामची ते सबाल्टर्ण या सिद्धांतांना बंधुत्वाच्या भावनेने कवेत घेतले. पण मार्क्सवादी तत्वज्ञान मानणा-या भारतीय पुरोगाम्यांना फुले, शाहू, पेरियार, नारायण गुरु व बाबासाहेब आणि त्यांची ब्राःमानावाद व जातीय शोषणाची मांडणी स्वीकारायला खूप वेळ लागला.
जे.एन. यु . सारख्या विद्यापीठात रोहित च्या समर्थनार्थ आवाज उठवणारा कन्हैय्या असो, उमर असो की शिलाला यांच्या मार्क्सवादी तत्वद्न्यानाच्या बांधिलकीमुळे ज्या प्रकारे सर्व डावे पक्ष उभे राहिलेत, तसे ते आसू (आंबेडकर स्टूडंटस असोसिएशन) च्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी हैदराबादला आधीच उभे राहिले असते तर आधीच्या ९ विद्यार्थ्यांच्या  आत्महत्या व त्यानन्तरचा  रोहित वेमुल्ला चा मृत्यू टाळू शकला असता. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, रोहित यांच्या खुनानंतर पुरोगामी वर्गाला जाग आली एवढेच नव्हे तर ज्यांना मारण्यात आले ते सर्व मनुवादी, अंधश्रद्ध, कर्मकांडी, जातीय पितृसत्तेचे विरोधक होते, ते मार्क्स इतकेच फुले-आंबेडकरी तत्वज्ञान मानत होते, आणि त्यांचा धाक सांप्रदायिक व धर्मांध ताकदींना अधिक आहे व होता हे लक्ष्यात आले.
आज बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीच्या निमिताने या देशातील सर्व  परिवर्तनवादी चळवळी व जन आंदोलने यांना आपण कुठे आहोत? आपल्या चळवळीत दलित बहुजन नेतृत्व आपण दरवेळी दुय्यम पातळीवर का ठेवले? स्वघोषित नेतृत्व किंवा लोकांमध्ये ते अडाणी आहे समजून त्यांच्यात बदल घडवायचा आहे असे समजून त्यांना आधार द्यायला निघालेल्या नेतृत्वाला या देशात खूप सन्मान मिळतो. कारण ते एका विशिष्ट जात व वर्गातून आल्याने त्यांच्या जवळ जे होते ते  सोडून आल्याचा, त्यागाचा एक मुलामा त्यांच्या नेतृत्वाला लावला जातो. असे स्त्री-पुरुष नेते या देशात कमी नाहीत. आहे रे वर्गात असणारे जेव्हा नाही रे अशा वंचित वर्गासाठी काम करतात तेव्हा त्यांचा त्याग नेहमी ठळकपणे दिसतो. पण नाही रे वर्गातील वान्चीतान्मधून जेव्हा नेतृत्व उभे राहते तेव्हा त्यांच्या जवळ जिवंत अनुभव, वेदना आणि काहीही नसताना सुद्धा परिस्थितीला भिडण्याचे आणि त्यातूनही आकाशाला गवसणी घालणारे उंच व सखोल असे व्यक्तित्व बनते तेव्हा ते संपूर्ण समाजासाठी दिशा दर्शक असते.
अशावेळी जे सोसतात तेच बोलतात व तेच नेतृत्व करतात आणि आपल्याच नव्हे इतरही शोषितांच्या वेदनेला समजून घेऊन एक विश्वात्मक कृती, सिद्धांतन मांडतात तेव्हा मार्टिन लुथर किंग, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,बिरसा मुंडा, महात्मा गांधी,  नेल्सन मंडेला, सावित्री बाई फुले, क्लारा झेटकीन, ताराबाई शिंदे, माया अन्जेलो, एलीस वाकर, अन्जेला डेव्हिस यांच्या सारखे नेतृत्व व विचारवंताना लोक विश्वात्मक पातळीवर स्वीकारतात. प्रस्थापित समाजाने कितीही लाथाडले तरी त्यांचे विचार काळाच्या कसोटीवर पुन्हा पुन्हा संघर्षातून पक्के होतात आणि प्रत्येक काळात विरोधक, धर्मांध ताकदी या मानावातावाद्यांना  पुसण्याचा प्रयत्न करतात. पण  शतकानुशतके चाललेल्या कर्मठ प्रथांशी टक्कर देतांना ही उपेक्षेला कधीही न घाबरलेली मंडळी आपल्यासारख्या सामान्य माणसाची ताकद  बनतात. मग तो बुद्ध असो, साक्रेटीस असो, गलिलिओ की तुकाराम की कबीर किंवा मीरा..
. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती च्या वर्षी घडणा-या काही मुख्य घटनांकडे नजर टाकली तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्ष्यात येते की आता पुन्हा एकदा ब्राह्मणवाद, धर्मांध शक्ती , या देशात जातीव्यवस्था, स्त्रियांना घराच्या चार भिंतीआड डांबण्याची, हिंदू विरुद्ध मुस्लीम वातावरण तयार करीत भारतातील बहुसंख्य बहुजनांची डोकी खराब करून फक्त ब्राह्मण व उच्चवर्र्णीयांचीच मुले    उच्च शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था आणायचा प्रयत्न करीत आहेत. सत्ता सतत ब्राह्मणवाद्यांच्या हातात असेल याचेच प्रयत्न सुरु आहेत. याला तोंड देण्यासाठी आता फुले-आंबेडकर-शाहू-पेरियार यांच्याशिवाय आता पर्याय नाही. मनुस्मृती विरुद्ध संविधान व ठोकशाही विरुद्ध लोकशाही असा हा संघर्ष असणार आहे.
या पार्श्व भूमीवर स्त्रियांच्या चळवळीचे  व स्त्रीवादी अभ्यासकांचे फुले-आंबेडकर विचारधारेबद्दल वैचारिक आकलन त्यासंदर्भात स्त्री चळवळीची  ऐतिहासिक  पृष्ठभूमी थोडक्यात समजून घेणे महत्वाचे आहे. इतिहास जरा डोळसपणे बघितला तर लक्ष्यात येते की भारतीय स्त्री चळवळ ही फुले-आंबेडकरी विचारधारेतूनच जन्मली. तिचे नेतृत्व सुद्धा या देशातील शुद्रातीशुद्र म्हणजेच आजचे बहुजन-दलित म्हणजेच ब्राह्मणेतर मानले गेलेल्या जातीतील स्त्रियांनी केले. सावित्रीबाई व त्यांच्या समकालीन असलेल्या सर्व बहुजन दलित स्त्रियांनी आपल्या भगिनी मानून ब्राह्मण स्त्रियांवरच्या अन्यायाबाबत आवाज चढविला. ज्या काळात एकाही ब्राह्मण किंवा   उच्चवर्णीय पुरुषाने आपल्या पत्नीला शिकवण्याचे उघड धाडस केले नव्हते व इतर स्त्रियांना शिकवण्याचे प्रोत्साहन दिले नव्हते त्या काळात जोतीराव फुले यांनी ती हिम्मत दाखवली.
स्त्री चळवळीचे जनक जोती-सावित्री
या देशात पहिल्यांदा स्त्री ला मानव म्हणून संबोधणारे, प्रत्येक स्त्री ला मानवी हक्क आहेत व पुरुष तिचे शोषण करतात व धर्माग्रंथामधून शोषणाचे समर्थन करतात अशी जाहीर मांडणी करून ब्राह्मणी पितृसत्तेला आव्हान करणारे महात्मा जोतीराव फुले हे या देशातील स्त्री चळवळीचे जनक ठरतात.
ते म्हणतात  “धूर्त व कावेबाज ऋषी-मुनींनी केलेल्या संहिता , स्मृत्या वगैरेतून बळकट आधार  देऊन आर्य भट  ब्राह्मणांनी स्वत:च्या कुटुंबातील असो किंवा इतर स्त्रियांच्या शोषणाच्या दुष्ट चाली प्रचारात आणल्या व त्यांचाच कित्ता अज्ञानी कुणबी, सोनार वगैरे जातींनी घेतल्याने ते आपल्या सुनाना मुलींना संकटात पाडतात----स्त्री-पुरुष एकसारखे एकंदर सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यासा पात्र  असता स्त्रियांस एक तर्हेचा  नियम लागू करणे, हा निवळ पक्षपात होय. –काही धाडसी पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी  बनावट मतलबी धर्मापुस्तकात स्त्रियांविषयी आपमतलबी  लेख करून ठेविले आहेत”---[1]
सावित्रीबाई फुले या देशातील प्रथम शिक्षिकाच नव्हत्या तर ज्या काळात एकही ब्राह्मण स्त्री शिकली नव्हती व पुढे येऊन शिकवू लागली नव्हती, त्या काळात सर्व मनुस्मृतीची बंधने  नाकारून त्या  मांग, मातंग, महार, कुन्बी, मा ळी, रामोशी, कैकाडी या सारख्या सर्व शुद्रातीशुद्रांसोबत ब्राह्मण जातीच्या मुली- स्त्रियांना एकत्रित शिकवण्याचे धाडस करणा-या पहिली महिला होत्या. १८४८ साली ज्यावेळी सावित्रीबाई शिक्षिका झाल्या, तेव्हा त्यांचे वय होते अवघे १७ वर्षे. त्यांच्या बरोबर फातिमा शेख, सगुणा क्षीरसागर व सरस्वती गोवंडे या मैत्रिणी शाळेत जात. फातिमा शेख यांचे भाऊ मुन्शी गफार बेग यांनी फुलेंना आपल्या घरात आश्रय दिला होता व शाळेसाठी जागा देऊ केली होती. [2] त्यामुळे हिंदू-म्मुस्लीम मराठी भाषिक सर्व शुद्रातीशुद्र मुलींसाठी शाळा निर्भीडपणे चालवण्याचे श्रेय सावित्रीबाईनाच जाते. त्यासाठी त्यांनी गणित, इंग्रजी  व शिक्षण पद्धती सारख्या विषयाचे शिक्षण मिशेल बाई (स्कॉटीश मिशनरी) कडून घेतले होते. भाषा व साहित्यावर त्यांचे प्रभुत्व होते. शिवाय जोतीरावांच्या सान्निध्यात राहून त्यांनी ब्राह्मणांनी लिहिलेले धूर्त ग्रंथ वाचून त्यावर स्वत: समीक्षा करावयास सुरुवात केली होती.
बहुजन नेतृत्वाला हीन दाखविण्यासाठी समकालीन व वयाने लहान ब्राह्मण नेत्यांशी  तुलना व कालविपर्यास

आता प्रश्न आहे तो आपल्याच स्त्री चळवळीत सावित्री व पंडिता रमाबाई यांची तुलना करून रमाबाईना पहिली शिक्षित स्त्री ठरविण्याचा केला जाणारा ब्राह्मणवादी प्रयत्न. एकतर ज्या वेळी सावित्रीबाई व जोतीरावानी पहिली मुलींची शाळा काढली ते साल होते १८४८. रमाबाईचा  जन्मही तेव्हा झाला नव्हता. त्यांचा जन्म झाला १८५८ मध्ये म्हणजे तब्बल दहा वर्षांनी.   म्हणजे रमाबाई च्या जन्माच्या वेळी सावित्रीबाई फुले यांचे वय होते २७ वर्षे. त्यामुळे सर्व जाती धर्मातील मुलींसाठी पहिली शाळा काढणारी व तिथे शिकवणारी पहिली शिक्षिका बहुजन समाजातीलच आणि ती क्रांतीजोती सावित्री फुले. .
आपल्याकडे जाणीवपूर्वक काळाची सरमिसळ  करून इतिहास शिकवण्यामागे एक उद्देश हा असतो की शुद्रातीशुद्र व महिलांचा विशेषत: सामान्यामधील असामान्यांची माहिती लोकांना होऊ नये. कारण सर्वच पराक्रम फक्त ब्राह्मणांनी वा उच्च वर्णीयांनी केले असा इतिहास लिहिण्याचे व ठसविण्याचे प्रयत्न झालेच नसते.
ज्यावेळी या देशात सामाजिक क्रांतीचा पाया महाराष्ट्रात रचला जात होता तेव्हा जोतीरावांच्या वयाचे होते लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख. त्यांचा जन्म १८२३ सालचा. ते जोतीरावापेक्षा ४ वर्षांनी मोठे होते. समाजसुधारक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची शतपत्रे प्रसिद्ध आहेत. जातीभेद नावाचा त्यांचा निबंध १८८७ साली प्रकाशित झाला. त्याआधी १४ वर्षांपूर्वी  जोतीराव  फुले यांचे १८७३ मध्ये गुलामगिरी व ब्राह्मणांचे कसब हे या देशातील जातीव्यवस्थे मागील  राजकारण उघड करणारे पुस्तक प्रकाशित झाले होते. जोतीराव फुले यांचे नाव घेतल्याबरोबर अनेक लोक आमचे आगरकर पण कमी नव्हते असे जेव्हा म्हणतात तेव्हा ते १९ वे शतक म्हणजे एकाच वेळी जन्माला आलेली सर्व माणसे असे गृहीत धरतात. हा लेख लिहिण्यामागे माझा उद्देश असाही आहे की लोकाना फुले व आंबेडकर हे काळाच्या व त्यांच्या समकालीन समाज सुधारकापेक्षा किती पुढे होते, किती दूरदृष्टी असणारे विचारवंत होते हे लक्ष्यात आणून द्यायचे आहे. आगरकर व टिळक  या दोघांचा  जन्म १८५६ साली झाला. टिळक आणि आगरकर यांची मैत्री व मतभेद हे माध्यमांसाठी नेहमीच कुतूहल राहिले आहे. पण समाजसुधारक असणा-या आगरकरांना फुलेंनी नेहमीच पाठिंबा दिला.

दुसरे असे दाखविण्याचा प्रयत्न होतो की रमाबाई रानडे याच आद्य शिक्षिका आणि न्यायमूर्ती रानडे हेच कसे आपल्या पत्नीला शिकविणारे पहिले नेते हे दाखविण्याचा सपाटा माध्यमांनी लावला आहे. इथे महत्व आहे ते दोन गोष्टी समजून घेण्याच्या. सावित्री व जोतीराव यांचे लग्न त्या काळातील रूढीनुसार लहान वयात झाले होते. पण हा बाल- जरठ विवाह नव्हता. त्या काळात ब्राह्मण मागासलेले होते व ते बाल जरठ विवाह लावीत. विधवांचे केशवपन करीत. विधवा हा कुटुंबावर ओझे मानून तिला सती जाण्यासा भाग पाडीत. म्हणूनच प्रथम सर्व सुधारणा ब्राह्मण जातीतील पुरुष मानसिकता बदलण्यासाठी कराव्या लागल्या. सती हे ब्राह्मणा खाप पंचायतीचे एक भयावह रूप होते. तसेच ते इतर समाजावरही बाल विवाहाचीच सक्ती करीत होते. लोकमान्य टिळक अशा सनातनी लोकांचे पुढारी व समर्थक होते.
न्यायमूर्ती महादेव रानडे यांचा जन्म १८४२ मध्ये झाला. ते जोतीबांपेक्षा १६ वर्षांनी लहान होते. ज्यावेळी फुलेंनी पहिली शाळा काढली तेव्हा रानडेंचे वय अवघे सहा वर्षांचे होते. मग कसे काय रानडे पहिले पुरुष पत्नीला शिकवणारे ? हान ते ब्राःमानाम्म्धील पहिले पती होते आपल्या मुलीच्या वयाच्या बायकोला शिकवणारे. बरे त्यांचा विवाह हा बाल जरठ विवाह होता. त्यांच्यावरील सिरियलमध्ये एका गोड व चांगला अभिनय करणा-या मुलीला आणूनही  न्यायमूर्तींचे  वय त्यांच्या बायकोच्या वडिलांच्या वयाचे होते हे काही सिरीयालवाले लपवू शकले नाही, कारण इतिहासाची ही गल्लत त्याना परवडली नसती.  कितीही जरी उदात्तीकरण केले तरी एवढ्या विद्वान पंडित न्यायामुर्तीला आणि स्त्री सुधारणेसाठी झटणा-या माणसाला वयात ही न आलेल्या ११ वर्षांच्या मुलीशी लग्न न करण्याचे व आपले घरदार सोडण्याचे धाडस झाले नाही. जेव्हा रानडे ३१ वर्षांचे होते तेव्हा रमाबाई केवळ ११वर्षान्च्या होत्या, त्यांच्यामध्ये सुमारे व २० वर्षांचे अंतर असतांना का त्यांना असे प्रोजेक्ट केले जाते?. त्यामुळे आपल्या बायकोला नव्हे तर आपल्या मुलीला शिकविल्याचे काम रानडे करू शकले. मी जेव्हा ‘खरेच का स्त्री मुक्ती चळवळ सावित्रीचा वारसा चालवीत?

न्यायमूर्ती रानडे यांचे बाकीचे खूप भरीव कार्य आहे, त्याबद्दल फुलेंनी आपल्या लेखनातून व सभेतून पण रानडे यांना दाद दिली व ज्येष्ठत्वाच्या नात्याने कौतुक केले. मग तरी पुरोगाम्याधील ब्राह्मणवादी कालविपर्यास करून जोतीबांपेक्षा आगरकर, रानडे श्रेष्ठ कसे व सावित्रीपेक्षा पंडिता रमाबाई कशी श्रेष्ठ हे जेव्हा जाणीव पूर्वक प्रचार करतात. तेव्हा फुले-आंबेडकरांनी ब्राह्मण जातीतील स्त्रियांवर झालेल्या अन्यायाला वाचा न फोडता फक्त स्व जातीतील स्त्रियांसाठी राजा राम मोहन रोय, ईश्वरचंद्र विद्यासागर, आगरकर, कर्वे यांच्यासारखे कार्य केले असते तर आजही ब्राह्मण व उच्चवर्णीय  स्त्रीला मतदानाचा व वारसा हक्काचा सूर्य दिसला नसता.  

ज्यावेळी रमाबाई रानडे पाटीवर अक्षरे गिरवू लागल्या होत्या तोवर फुले दांपत्यांनी सुरु केलेल्या शाळेला २५ वर्षे झाली होती. (१८७३). सावित्त्रीबाईंच्या  शाळेत शिकत असतानाच अनेक मुली लिहू लागल्या होत्या. सावित्रीबाईची एक मांग जातीतील विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिचा निबंध तिच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने लिहिला व ज्ञानोदय या नियतकालिकाने तो  छापून प्रसिद्ध केला. तेव्हा पंडिता रमाबाई मुक्तापेक्षा लहान होत्या. त्या संस्कृत शिकल्या म्हणून ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. आपल्या वडिलांकडून संस्कृत शिकत होत्या.
 जेव्हा रमाबाई रानडे यांनी पाटी हाती घेतली त्या काळात १८८२ मध्ये सत्यशोधक चळवळीतील बुलढाणा येथील ताराबाई शिंदे या कुणबी-मराठा बहुजन जातीतील मुलीने निबंध लिहून भारतातील प्रथम स्त्रीवादी निबंधकार म्हणून मोहोर उठवली.
एक तरी पती आपल्या पत्नीवर खरी प्रिती करतो म्हणून तिच्या मृत्यूनंतर यमाच्या दरबारात तर सोडाच, त्या वाटेने तरी गेला आहे का? स्त्रियांसाठी व पुरूषांसाठी रूढी, परंपराच्या आधारे वेगवेगळे नियम सांगितले गेले. त्यातून प्रतिव्रताधर्म सांगितला गेला. स्त्री-पुरूषांसाठी दुहेरी मापदंड का? ‘सती प्रथायेते मग सताप्रथाका नाही, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुरुषसत्ताक दुहेरी मापदंडांना प्रश्नांकीत केले आहे
पंडिता रमाबाई यांना ज्यावेळी येथील ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले तेव्हा महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांना पाठिंबा दिला. पुण्यातील ब्राह्मणांनी केलेल्या छळाला तोंड देत त्या १८८० च्या सुमारास स्वत: कलकत्त्याला स्त्री शिक्षणाचा प्रचार करीत पोचल्या. तिथेच त्याना बंगाली विद्वानांनी पंडिता ही पदवी दिली. तिथे त्यांनी बहुजन (शुद्र) जातीतील बिपीन बिहारीदास मेधावी यांच्याशी लग्न केले. तो एक विद्रोह होता व त्यांच्या अशा आंतरजातीय विवाहाला व त्यानंतर त्यांनी १८८९ मध्ये मुंबईत शारादासादन सुरु केले, या कार्यासही जोतिबांनी पाठिंबा दिला. नोव्हेंबर १८९० मध्ये ज्यावेळी फुले गेलेत , त्याच सुमारास पुण्यात रमाबाईंनी केडगाव येथे काम सुरु केले.
जेव्हा मराठी भाषेतच काय इतर कुठल्याही भाषेत भारतात स्त्रियांची स्थिती वर्णन करनारे लेखन एखादी स्त्री करेल याची कल्पना करू शकत नव्हते त्या काळात ताराबाई शिंदे  यांनी १८८२ साली स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले. आज भारतातील स्त्रीवादी इतिहासाचे आद्य लेखन म्हणून हा निबंध गौरवला जातो. ताराबाई या कुणबी मराठा जातीतील , पहिली स्त्रीवादी लेखिका ही सत्यशोधक समाजाच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या वडिलांबरोबर विदर्भात  बुलढाणा येथे कार्य करीत होती. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे स्वत: सत्यशोधक समाजाचे सभासद होते.ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. जेव्हा ब्राह्मण स्त्रियांची मुस्कटदाबी चालली होती, त्या काळात लेखणी हातात घेऊन ब्राह्मणी पितृसत्तेवर घणाघाती घाव घालून त्यांचे ढोंग उघडकीला आणणारी ताराबाई  ब्राह्मण स्त्रियांना शिक्षित होण्याचे व सती प्रथे  विरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन करीत होती.
महाराष्ट्रातीलच नव्हे भारतातील पहिली पत्रकार व संपादक होण्याचा मां सुद्धा सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या तानुबाई बिर्जे यांच्या कडे जातो. महात्मा फुलेंचे सहकारी व शेजारी देवराव ठोसर यांची कन्या तानुबाईंचा जन्म 1876 मध्ये पुण्यात झाला. व सावित्रीबाई फुले त्यांना आपली  मानसकन्या मानत. त्यांचं शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं आणि  26 जानेवारी 1893 रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकीय पद्धतीने त्यांचा विवाह झाला. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये त्यांनी 1894 ते 1905 अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन दिनबंधुहे वृत्तपत्र 1897 मध्ये पुन्हा सुरू केलं. कृष्णाजी भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं होतं ते 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत सुरू केलं. त्यानंतर 1897 मध्ये बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली व ते 1906 पर्यंत चालवलं, मात्र 1906 मध्ये प्लेगने त्यांचा मृत्यू झाल्यावर ते सुरु ठेवण्याची जबाबदारी तानुबाई बिर्जे यांनी घेतली. सावित्रीबाई व जोतीराव यांच्या तालमीत तयार झालेल्या तानुबाईंनी अतिशय कर्तबगारीने हे वृत्तपत्र 1906 ते 1912 पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे चालवून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.[3] 
याचा अर्थ असा की सत्यशोधक ब्राह्मणेतर स्त्री-पृशानी येथील धर्मसत्ता व ब्राःम्नावाडी पितृसत्ता (हा शब्द स्त्रियांना शुद्र बनविणारे ब्राह्मणी कसब’ या फुलेंच्या लेखनातून जन्माला आलेला आहे. ब्राह्मणी पितृसत्ता या विचारधारेचे जनक महात्मा फुले आहेत.) ज्या ब्राह्मणेतर स्त्रीवाद्यांनी आजवर फुले-आंबेडकरांची विचारधारा शिरोधार्य मानतच स्त्री चळवळीत कार्य केले, लेखन केले, विचार प्रसार केला, संघर्ष केला त्यांना मुख्य प्रवाह न मानता फक्त ब्राह्मण वा उच्च जातीच्याच स्त्रियांनी १९७५ नंतर ची स्वायत्त चळवळ उभी केली व तीच या देशातील मुख्य प्रवाह असलेली चळवळ आहे,  असा एक समज पसरविण्यात व त्यातून बाकीच्या शिकार होणा-या स्त्रियांसाठी कार्य करणा-या  देशभरातील सर्व उच्चवर्णीय स्त्रियां ची नावे मात्र नेतृत्वात असे का घडले? व त्यांच्याच विचारांना मुख्य प्रवाह का मानले गेले?
आता अगदी स्वत:च्या डोळ्यांनी आपण केलेले कार्य हे समकालीन इतिहास लेखक व संशोधकांकडून अनुल्लेखाने मारले जातेय हे आमच्या सारख्या दलित बहुजन कार्यकर्त्यांना समजते आहे. त्यावर स्वत:चे आत्मकथन, अनुभव व मौखिक इतिहास लिहून काढण्याची जबाबदारी अर्थातच आमची आहे. कारण आम्ही दिलेले योगदान  विशेषत: जाती व्यवस्था व प्रस्थापित धर्मांधता व अंध्स्राद्धा या बाबत आम्ही दिलेला संघर्ष आपोआप आमच्या बद्दल लिहिताना सांगितला जात नाही. आमचे कार्य कुणासाठी तरी केले असे नोंदवून त्या व्यक्तींना विषयापेक्षा, सामाजिक समस्येपेक्षा मोठे केले जाते , म्हणून बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त आपण संकल्प करू या आदिवासी, दलित, बहुजन, सर्व अल्पसंख्यांक धर्म व विविध लिंगभाव असणा-या व्यक्तींच्या योगदानाचा, एकल महिला  हिंसेचा बळी ठरलेल्या स्त्रियांचा, पुरुषांचा  इतिहास आपण लिहून काढू या.
पण त्यासाठी लागणारी संसाधने, जागा, पैसा, फ़ेलोशिप्स, संशोधन संस्था व विद्यापीठं आपल्याजवळ उपलब्ध नाहीत. प्रस्थापित विद्यापीठांनी असे प्रकल्प हाती घेतले व आपल्याला  संधी मिळाली  तर अनेक नवीन अलिखित दालनं संशोधकांना उपलब्ध होतील असे दलित-बहुजन, आदिवासी, चे म्हणणे आहे. विविध विद्यापीठांमध्ये आता स्त्री अध्ययन केंद्र उघडली आहेत. पण लेखन व संशोधनाचे सर्व अधिकार व निर्णयप्रक्रिया अजूनही प्रस्थापित उच्च वर्णीय व सनातनी मानसिकता असणा-या लोकांच्या हातात आहे.[4]  त्यामुळे दलित बहुजन किंवा अब्राह्मणी स्त्रीवादावर जे काही मराठीत लिहिले गेले आहे, त्यातही व इंग्रजी भाषेतही दलित-बहुजन स्त्रियां काय म्हणतात? त्यांना काय म्हणायचे आहे? त्यांची मांडणी फक्त नाहीच परंतु अगदी फुले- आंबेडकरामना पण नेमके काय म्हणायचे होते? त्यांनी ज्या पद्धतीने फुलेंनी जातीसत्ता व पितृसत्तेसंदर्भातील ब्राह्मणी कसब ही संकल्पना इतकी व्यवस्थित पुराणातील दाखले देत आणि ब्राह्मणी धर्माच्या पडद्याआड शोषण कसे केले जाते हे गुलामगिरी या ग्रंथात विषद केले आहे. त्यालाच ‘ब्राह्मणी पितृसत्ता’ असे  म्हणत इंग्रजीत लेखन करून उमा चक्रवर्ती यांनीच पहिल्यांदा ब्राह्मणी पितृसत्ता अशी संकल्पना मांडली आहे असा एक सूर स्त्रीवादी व समाजशास्त्रीय अभ्यासकांनी लावला आहे. ज्यांनी फुले मुळातून वाचले आहेत अशा अभ्यासकांना मी काय म्हणते आहे ते कळेल. यालाच इंग्रजी भाषेत appropriation म्हणतात. हेच जर एखाद्या दलित-बहुजन संशोधाकाकडून असे घडले असते तर याला कॉपी राईटचा मुद्दा करत व plagerism ची केस सुद्धा अनेक नामी विद्यापीठांनी त्या विद्यार्थ्यांवर ठोकली असती. पण शब्दांचे खेळ करून नवी संकल्पना तयार केली असे काही लोक यशस्वी दावा करू शकतात. माझे म्हणणे असे आहे की मग सर्वांनाच ‘कॉपी राईट नको’ अशी भूमिका तरी घ्यावी व सर्व  स्त्रोत खुले करावेत किंवा मग यच्चयावत सर्व स्थानिक भाषा व इंग्रजीत त्यावरून लिहिलेले साहित्य त्या भाषेतील तज्ञांकडून तपासून घ्यावे व सर्वांनाच कडक नियम लावून plagerism संदर्भात तमा न बाळगता कडकपणे तपासावे, फक्त विद्यार्थ्याना नाही.  पण असे केल्यास अर्धे अधिक research आपल्याला केराच्या बादलीत टाकावे लागतील. त्यापेक्षा open sources धोरण ठेवले तर  original म्हणजेच मूळ संकल्पनेवर अभ्यासक वा समीक्षकाने केलेले कलम  वा नवे सिद्धांतन, किंवा अगदी तशीच कल्पना सुचल्यावर घडलेल्या प्रक्रिया याबाबत खुल्या दिलाने मोकळ्या वातावरणात चर्चा व्हावी.
खरेतर अशीच अपेक्षा दलित-बहुजन स्त्रीवादाबद्दल आहे. या संदर्भात पहिली दोन दशके अब्राह्मणी स्त्रीवाद म्हणून लेखन झाले आहे.ज्याला नंतर दलित-बहुजन व अलीकडे फुले-आंबेडकरी स्त्रीवाद म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.  भारतातील स्त्री चळवळीची वाटचाल बघितली तर एक महत्वाची  गोष्ट नाकारता येत नाही ती म्हणजे या देशातील स्त्री चळवळ धर्म सत्तेशी भांडल्याशिवाय पुढे जाउच शकत नाही. ती कामगार स्त्री असेल तरी तिचा वर्गीय लढा सुद्धा तिच्या जात वास्तवाशी जोडलेला आहे. या धर्मसत्तेशी भांडल्याशिवाय येथील दलित-बहुजनच काय ब्राह्मणा स्त्रीला सुद्धा हक्क मिळाले नाहीत. सती प्रथा बंद वगैरे सारख्या सुधारणा या सुद्धा ब्राह्मणवादी धर्माला पेलवणा-या नव्हत्या. मग फुले, शाहू-पेरियार आंबेडकर हे तर संपूर्ण धर्मालाच आव्हान करीत होते. हे धर्म सत्तेशी भांडण्याचे बळ व ऐतिहासिक परंपरा फुले-आंबेडकरी विचारधाराच देते. त्यातून ती स्त्रियांना ब्राह्मणी पितृसात्तेला आव्हान करायला प्रेरीत करते. म्हणूनच ती भारतातील स्त्री चळवळीची निर्मिक व रचनाकार ठरते.
आज ज्या स्त्रियां शनी शिंगणापूर मंदिरात प्रवेश करण्याचे आंदोलन करीत आहेत त्या भूमाता ब्रिगेडच्या स्त्रियां (तृप्ती देसाई व साथी) असो की ज्या मन्दिर प्रवेशाच्या कायद्या च्या आधारावर जनहित याचिका दाखल करणा-या (विद्या बाळ व सहकारी )स्त्रियां असो त्यांच्यासाठी मंदिर प्रवेशा ची व अस्पृश्यते च्या विरोधातील पार्श्व भूमी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच तयार करून ठेवली आहे. बाबासाहेबांच्या  मार्गदर्शनाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी २ मार्च १९३० रोजी हजारो स्त्री-पुरुषांच्या साथीने श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशाचे रणशिंग फुंकले. अहिसक व शांतीमय पद्धतीने सातत्याने पाच वर्षं हा लढा सुरू होता व मानव मुक्तीचा एक अध्याय या काळाराम मंदिराच्या साक्षीने  लिहिला गेला. पण  मंदिरातील मक्तेदारी व त्याचे पौरोहित्य करणारा समाज हा  कायम अस्पृश्यता मानत आला. आता ते म्हणतात की न्यायालयाच्या आदेशानुसार जिथे पुरुषांनाही गाभा-यात प्रवेश नाही तिथे स्त्रियांना पण नाही याचा अर्थ मंदिरातील पुजारी पुरुष सुद्धा असू शकत नाही. त्यांना पुजारी पुरुष नाहीत हे सिद्ध करावे लागेल. तसेही सर्व तृतीय पंथी लोकांना मंदिराचे पुजारी बनवले तर त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न खरेच सुटेल व मंदिराचे गाभारे ज्या स्त्री- पुरुष स्पर्शाने विटाळत  होते ते वितालाणार नाही व या पद्धतीने लिंगभाव आधारित भेदभाव टाळून सन्मान पण मिळू शकेल.
बाबासाहेबांनी दूरदृष्टीने हेरले की हिंदू धर्मात काहीच बदल होणार नाहीत व अशा विषमतेवर आधारित धर्माला सोडून दिले. जिथे समतेचा खरा जागर आहे, जिथे  २५०० वर्षापूर्वी ज्या धम्मात बुद्धाने आपल्या शिष्याशी (आनंदाशी) विमर्श करीत  स्त्रियांची मागणी स्वीकारून पुरुषप्रधान मानसिकतेला बाजूला सारत स्त्रियांना धम्मदिक्षा दिली. त्या इतर धर्माच्या तुलनेत समतेच्या , विज्ञानाच्या, अहिंसा व करुणेच्या मूल्यांना महत्व देणारा मानवी धर्म म्हणून बुद्ध धम्माचा बाबासाहेबांनी स्वीकार केला.
दलित-बहुजन चळवळीतील पुरुष नेतृत्वाने तर  आपल्या विचारमंचावर सावित्रीबाईचा फोटो लावला की आपले स्त्रियांबाबतचे कर्तव्य संपले असे मानायला सुरुवात केली असे दिसते. यांच्या मंचावर  स्त्रियांना नाममात्र अगदी १०% सुद्धा प्रतिनिधित्व नसते.  आपली बांधिलकी फक्त ब्राह्मणवादी पितृसत्तेशी दाखविणे त्यांनी  सुरु केले आहे. ते आपल्या डाव्या बांधवांचा कित्ता गिरवीत आहेत. डावे वर्ग वर्ग करतात व जात आणि पितृसत्ता विसरून जातात व दलित-बहुजन पुरुष नेते जात जात मांडतात व पितृसत्ता व वर्ग संघर्ष विसरून जातात. डावे कधी ब्राह्मणवादी बनतील नेम नाही कारण मार्क्स जर्मन व गोरा असल्याने त्याचे तत्वज्ञान चालू शकत होते. त्यांच्यातील अपवाद दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांना सनातन्यांनी ठार मारले कारण ते ब्राह्मणवादाला व त्यांनी चालवलेल्या धर्म कर्मकांडाला विरोध करून तळागाळात जागृती करीत होते. आता रोहित-कन्हैया प्रकरणानंतर असे  डावे पुरोगामी जे जाती व्यवस्थेवर कधी टीका करत नव्हते   त्यांना कळून चुकले की आर एस एस शी लढायचे असेल तर फुले-आंबेडकर युती करावी लागेल. तीच राजकीय दृष्टया आपल्याला तारेल. शिक्षण संस्थात आपला जम कायम ठेवायचा असेल तर इथे मार्क्स सोबत फुले-आंबेडकर आता घ्यावेच लागतील. पण ते सोयीस्कर पणे एक गोष्ट  विसरतात की फुले प्रत्येक विचार व कृती मध्ये स्त्री व -पुरुष दोघांचा साकल्याने विचार करीत , त्यांच्या एकाही कार्यक्रमात त्यांनी समस्त स्त्री वर्गाचा बरोबरीने समावेश केला नाही असे झाले नाही. स्त्री मुक्ती संघटनेच्या गाण्यात खूप महत्वाची ओळ आहे –करू पहिले नमन जोतीबाला ज्याने स्त्री मुक्तीला जन्म दिला’ , तर स्त्री मुक्त म्हणजेच ‘आझाद’ झाली पाहिजे म्हणून या धर्मशास्त्राने रचलेल्या जंजाळातून मुक्ती हे कार्य  ज्योती सावित्रीने आयुष्यभर केले. तर बाबासाहेबांनी संविधान लिहितांना अत्यंत बारकाईने प्रत्येक शोषित घटकातील स्त्री वर्गाचा  समावेश केला व स्त्री-पुरुष समानतेचा कायदेशीर जाहीरनामा लिहून मनुस्मृती ची स्त्रियांच्या जीवनातील लुडबुड बंद केली. खरेतर  संविधान व त्यात अनुषंगाने मानवी हक्का संदर्भात लोकशाही ला अनुसरून स्त्रियांना सुद्धा  याचिका करण्याचे समान अधिकार आहेत. जे मनुस्मृती सारख्या चिरेबंदी वाड्यात कधीच नव्हते. त्यामुळे साम्मानातेवरून समतेकडे नेण्याचे काम सुद्धा आंबेडकरांनी केले. पण आज सर्वच पक्षांप्रमाणेच दलित-बहुजन पुरुष नेते स्त्रियांना आपल्या मंचावर बरोबरीने खुर्ची द्यायला घाबरतात. (कदाचित त्यांना भीती वाटत असावी की पुन्हा नव्या अनेक मायावती म्हणजेचसक्षम राजकारणी स्त्री नेतृत्व  तर जन्माला येणार नाहीत ना?) भाजपाची स्त्री शक्ती—प्रतिगामी व ब्राह्मणवादी मानसिकता असलेली स्त्री-शक्ती एकीकडे वाढत चालली आहे व दुसरीकडे दलित-बहुजन स्त्रियां पुन्हा एकदा समाजकारण व राजकारणात आणण्यासाठी त्यांचे बांधव सुद्धा तयार नाहीत. यामुळे दलित-बहुजन स्त्री-मुक्ती चळवळीला आपली रणनीती व दिशा ठरवून पुरूषांनीच  प्रगतीचे मार्ग रोखल्याने स्वत:ची वेगळी चूल मांडावी लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
एकूणच स्त्री चळवळीचे अपयश की अजूनही पुरुष मानसिकता बदलत नसून ते सर्वच मंचावर स्त्रियांच्या वतीने बोलू लागले आहेत.  एवढेच  काय स्त्रियांच्या चळवळीतील दयाळू स्त्रियांनी त्यांना पदराखाली घेतल्याने आता ते सर्वच स्त्री परिषदा स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्रियांच्या चळवळीची बाजू जेंडर च्या मोठ्या व्यापक अवकाशात मांडू लागले आहेत. आता ते जसे आम्ही स्त्रियांना समजतो म्हणतात तसे आम्ही पुरुषांना समजतो म्हणत किमान ३३% तरी जागा स्त्रिया  मिळवतील का? किमान तथाकथित समतावादी दलित-बहुजन मंचांवर स्त्रियांना ३३% तरी जागा हे सर्व पुरुष साथी देऊ लागतील अशी अपेक्षा करावी काय?
फुले-आंबेडकरी नेतृत्व हे समतावादी विचारधारेचे प्रवर्तक असून व त्यांनीच इथे सर्व स्त्रियांच्या मुक्तीसाठी व समान, न्याय्य अधिकारांसाठी ची चळवळ रुजवली. खरेतर सर्वच जातीतील स्त्रियां ब्राह्मणी धर्मग्रंथांनी शुद्र ठरविल्याहोत्या.  आज मात्र  ब्राह्मण, उच्चवर्णीय व त्यांच्याच मानसिकतेत तयार झालेली  अब्राह्मणी सर्वसामान्य अशिक्षित वा सुशिक्षित झालेली स्त्री (एवढेच काय पुरोगामी चळवळीतील उच्चवर्णीय स्त्री ) असो, या दलित-बहुजन  समाजक्रांतीकारक स्त्री-पुरुषांचे उपकार पूर्ण विसरून गेली आहे, ती विसरून गेली की तिला पण शूद्रच गणले गेले होते.  बहुजन स्त्री ब्राह्मणवादी स्त्रीच्या पावलांवर पाउल टाकते आहे . तिने जर जागृत दलित स्त्रीच्या पावला,वर पाउल ठेवले तर तिची गुलामीतून सुटका होऊ शकते. त्यामुळे फुले-आंबेडकरी चेतना असलेल्या कुठल्याही जाती-धर्मात जन्मलेल्या स्त्री—कार्यकर्त्या अभ्यासकांनी आता ही समतेची पताका खांद्यावर घ्यावी लागेल. त्यांची जबाबदारी वाढली आहे.
कौटुंबिक हिंसाचार विरोधी चळवळीचा पाया
आपण असे म्हणतो की १९७५ नंतरच्या स्वायत्त स्त्री चळवळीचा प्रमुख मुद्दा होता स्त्रियांवरील हिंसाचार व अत्याचार. एक गोष्ट लक्ष्यात येते की १९ व्या शतकात ज्या गोष्टी धर्माच्या नावावर होत असत त्यात प्रमुख होता स्त्रियांवरील अत्याचार .१९ व्या शतकातही तो कुटुंबातील पुरुष व पितृसत्तेने दिलेल्या अनिर्बंध अधिकारातून सासरच्या स्त्रियां पण करीत (करतात) व विशेषत; ब्राह्मणा स्त्रियां त्याच्या बळी होत्या. . त्याला फुले दाम्पत्याने फक्त सती व केशवपन, विधावाविवाह  असे फक्त  सुधारणावादी रूप न देता ब्राह्मण विधवा स्त्रियांची होणारी लैंगिक घुसमट, त्यांचे होणारे शोषण व त्याना शरीर संबंध ठेवावेसे वाटू शकतात पण ते लपून छपून असल्याने त्या आपले गर्भ पाडून टाकतात अशी   व्यवस्थित वैचारिक भूमिका मांडून २०० वर्षांपूर्वी सनातन्यांच्या विरोधात जाऊन पहिले आधारगृह काढले, बाल हत्या प्रतिबंध गृह काढले. आणि कौटुंबिक हिंसा ही खाजगी नसून ती सामाजिक आहे व त्याबाबत सरकारला निवेदन देऊन त्यांना कडक कारवाई करावयास सांगणे  म्हणजे राजकीय हस्तक्षेप झाला तरच कौटुंबिक अत्याचार थांबतील याची पूर्ण वैचारिक समज ठेवून  पावले उचलली त्यांनी सार्वाजनिक सत्यशोधक धर्माद्वारे येथील मनुस्मृती-प्रणीत ब्राह्मणी धर्म सत्ता , जातीसत्ता, पितृसाता व अनुषंगाने येथील सरंजामी वर्ग सत्तेला आव्हान केलेले दिसून येते. त्यामुळे १९व्या शतकातील स्त्रीवाद हा सत्यशोधक चळवळीने मांडला, रुजवला हे नि:संशय वादातीत सत्य आहे. आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली, चवदार तळे  खुले केले , त्यातून कितीतरी दलित-बहुजन स्त्रियांसाठी आजीविका असलेल्या पाण्यासाठीची वनवन थांबविण्याची सुरुवात झाली. कुठलाही भेदभाव मनात न ठेवता सर्वधर्मातील व तसेच सर्व , (उच्च जातीतील सुद्धा) स्त्रियांना त्यांच्या वर झालेल्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी संविधानाद्वारे  मुलभूत अधिकार दिले. त्यामुळे येथील स्त्रीवादी संरचना व सिद्धांतन कायद्याच्या रुपात आपल्या हाती प्रथम बाबासाहेबांनी दिले हे मान्य करायला हवे. याच अब्राह्मणी विचारधारेतील एक महत्वाचे विचारवंत व कृतीशील शासक  राजर्षी शाहू हे खरे तर आजच्या  'कौटुंबीक हिंसाचार विरोधी कायद्याचे जनक' आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी स्वत: लक्ष घालून दिनांक २९जुलै १९१९ रोजी स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्याचे बंद करण्याबद्दल नियमतयार केले होते. 2 ऑगस्ट 1919 पासून ते अंमलात येतील व हे नियम करवीर संस्थानातील सर्व हिंदी प्रजेस लागू होतील आणि रेसिडेंट साहेबांनी मंजूर केल्यास ते इतर संलग्न जहागिरीनाही लागू होतील, असे त्यांनी जाहीर केले. आजच्या कायद्यात सुद्धा शाहूंनी सांगितलेले प्रतिबंधात्मक नियम अंतर्भूत करणे गरजेचे आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे
पाश्चात्य देशातील स्त्री-मुक्ती  चळवळीने प्रभावित झालेल्या स्त्रीवादी विचाराधारेसाठी या देशात आधीच फुले-आंबेडकरी, शाहू-पेरियार यांच्या  सामाजिक क्रांतिकारक  विचारधारेने व स्त्री सुधारणावाद्यांनी अशी जमीन कसून नांगरून जमीन ठेवली होती. म्हणून या देशाच्या मुख्य स्त्रीवादी प्रवाहाचा पायाच दलित-बहुजन नेतृत्वाने रचला आहे व तोच स्त्रीवादाचा मुख्य प्रवाह आहे, हे मान्यच करावे लागेल.


लता प्रतिभा मधुकर










[1]  महात्मा फुले समग्र: वाड्गमय  (१९९१, संपा. फडके य. द) पृष्ठ . ४६५-४७१
[2] झेबुन्निसा शेख यांची मुलाखत उमरेड येथे मार्च २०१४ ला घेतली होती. त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार.
[3] सत्यशोधकी साहित्याचा इतिहास, खंड पहिला. १ मे २०१० आणि संदर्भ प्रकाश पोळ http://www.sahyadribana.com/2011/11/blog-post_12.html
[4] लता प्र.म.( मिळून सा-याजणी, जुलै २०१४ “) शर्मिला रेगे च्या अखेरच्या पुस्तकाच्या निमित्ताने”

No comments: