Thursday, April 21, 2016

एप्रिल २०१६ रोहितच्या मृत्युनंतर दलित-बहुजन माता भगिनींचा राष्ट्रीय एल्गार लता प्रतिभा मधुकर

एप्रिल २०१६
 रोहितच्या मृत्युनंतर दलित-बहुजन माता भगिनींचा राष्ट्रीय एल्गार
लता प्रतिभा मधुकर
“ मला शासना कडून दयेची  भीक नको, माझ्या रोहितचा हक्क हवा,” राधिका वेमुल्लाचे हे शब्द अनेक दलित –बहुजन, आदिवासी व अल्पसंख्यांक तसेच ज्या विद्यार्थ्यांबाबत भेदभाव झाला आहे , त्या सर्वांसाठी आशेचा किरण ठरले  आहेत. १६ जानेवारी ते १७ मार्च, (जेव्हा मी हा लेख लिहितेय) बरोबर तीन महिने झाले. रोहितची आई शासनाचे दरवाजे न्यायासाठी ठोठावते आहे. तिच्या मुलाला शासनाने, विद्यापीठ प्रशासनाने दलित नाही, ओबीसी घोषित केले, कारण काय तर त्याला मरणोत्तर पण scholarship चे उर्वरित रक्कम मिळू नये. दुसरे असे की आपल्या देशात मुलगा. मूल आईच्या योनीतून जन्म घेत असले तरी जात मात्र बापाची लागते. सर्व सोयीचे राजकारण आहे. ९ महिने पोटात सांभाळ केलेल्या, जन्म दिल्यावर त्याला लहानाचे मोठे करण्यात ज्या बापाचा काही ही वाटा नाही, बायको व मुलांना वा-यावर सोडून देणारा बाप, जिने दिवस रात्र मजुरी केली, दुस-यांचे कपडे शिवले, मुलांना उच्च शिक्षणाची स्वप्ने दिली, त्या आईची जात या मुलांना लावायला मंत्री   महोदय स्मृती इराणी व बंडारू दत्तात्रय  तयार नाहीत व त्यामुळे प्रशासन सुद्धा तयार नाही. मी माझ्या मागील लेखात लिहिले होते त्याची पुनरावृत्ती करणार नाही, पण लेखा चा संदर्भ लागण्यासाठी पार्श्वभूमी देणे गरजेचे आहे.

“एखाद्या आईसाठी तिच्या मुलाला देशद्रोही ठरविणे यापेक्षा अधिक कोणताही अपमान असू शकत नाही. एकीकडे नरेंद्र मोडी म्हणताहेत की या देशाने आपला पुत्र गमावला. पण ते आपल्याच मंत्री मंडळातील स्मृती इराणी व बंडारू दत्तात्रय यांच्यावर रोहितला देशद्रोही म्हटले याबद्दल कारवाई करीत नाहीत. काह्रेतर आजपर्यंत हे दोघेही मंत्री पदावरून निलंबित व्हायला हवे होते.”  राधिका नंतर या देशात लगेच कन्हैया , उमेर आणि अनिर्बान च्या आईला त्यांच्या मुलांना देशद्रोही ठरविल्याबद्दल, अशाच अपमान व मानहानीला सामोरे जावे लागले.
काय होता रोहितचा दोष? तो आंबेडकरवादी होता हा?
 तो व त्याचे मित्र दोन्ता प्रशांत तसेच  आंबेडकर  स्टूडेंट असोसिएशन चे इतर विद्यार्थी हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठात  आंबेडकर जयंती साजरी करीत असत. प्रशासन व अभाविप च्या विद्यार्थ्याना हे आवडत नव्हते. आणि या वर्षी मात्र विद्यापीठात प्रशासन पुढाकार घेऊन आंबेडकर जयंती साजरी करणार आहे त्या वेळी,  त्याच्या सहका-यांना च काय विरोधकांना ही रोहितची आठवण् आल्याशिवाय राहणार नाही. आज सर्वसामान्य जनतेच्या कायम स्मरणात आहे रोहित व प्रशांत या दोघांना विद्यापीठाने निष्कासित केल्यावर आंबेडकरांची प्रतिमा घेऊन बाहेर पडतानाचे  छायाचित्र.


रोहितच्या हत्येवर पडदा टाकण्यासाठी कन्हैय्या व जे. एन. यु . प्रकरण उभे करण्यात आले आणि ते सरकारला खूपच महाग पडले. कधीच मोर्चे, निदर्शने न पाहिलेल्या व अचानक, पार्लमेंटच्या वर्गात दाखल झालेल्या स्मृती इराणीनी ‘आझादी ‘ही घोषणा सरळ फक्त काश्मिर मधील अतिरेक्यांशी जोडली. जर तिला खरोखरच या देशातील स्त्री आंदोलन  माहिती असते तर आजादी,म्हणजेच मुक्ती व या देशातील मुक्ती मागणारे पहिले आंदोलन म्हणजे स्त्री-मुक्ती आंदोलन हे तिला कळले असते. 
“हम बहना मांगे आझादी, हर मां मांगे आझादी , अत्याचार से आझादी, बलात्कार से आझादी, पाबंदियो से आझादी,” हे नारे देताच आम्ही गेली ४०  वर्षे  स्त्रियांच्या हक्काचा जागर मानला आहे. या देशात सामाजिक, समता व समानतेवर आधारित क्रांती येण्या साठी परिवर्तनासाठी पहिली अट आहे आमची आझादी ! आमचे स्वातंत्र्य अबाधित राहणे. जर तो नारा कन्हैय्या, उमर, शिलाला, व जे. एन. यु. किंवा हैद्राबाद च्या  विद्यार्थ्यांकडून आला तर एव्हढे रान का केले भाजपाने? कारण धर्मान्धतावादी सत्तेला सरळ सरळ हा नारा टक्कर देतोय. आव्हान करतोय.
कन्हैय्याने तळागाळातील लोक व त्यातही स्त्रियां  ‘आझादी’ चा नारा का देतात, याचे तर्कशास्त्र  हे माध्यमांमधून राष्ट्राला व्यवस्थित समजावून सांगितले . तो म्हणाला “स्वातंत्र्य मिळूनही या देशात भूकबळी, कुपोषण, माता मृत्यू, बलात्कार, अत्याचार, विद्यार्थ्यांना अर्ध्यातच शिक्षण सोडावे लागतेय, बेरोजगारी , शेतक-यांच्या आत्महत्या यांनी थैमान घातले आहे. या सर्वापासून सामान्य जनतेला मुक्ती हवी आहे. देशातच आझादी , देशापासून आझादी नव्हे. येथील सामान्य माणसाच्या वाट्याला अजूनही अच्छे दिन आलेले नाहीत. त्या फक्त घोषणा आहेत. म्हणून अशा खोट्या  ढोंगी शासनापासून आझादी. पितृसत्तेचा व जातीयवादाचा पुरस्कार करणारी मनुस्मृती पुन्हा लादान्याचा प्रयत्न चाललाय, म्हणून मनुवाद आणि धर्मांधते पासून आझादी.” कन्हैय्या ने वारंवार जाहीर केले की त्याची प्रेरणा बाबासाहेब आहेत आणि त्याचा आजचा खरा नायक आहे रोहित वेमुला.
अशावेळी रोहित असो, कन्हैया  असो, अनिर्बान किंवा उमेर किंवा शिलाला, यांच्या आई-वडिलांची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. आणि पुढील धोके ओळखून एक सपोर्ट सिस्टीम, म्हणजेच मैत्रीचा असा हात पुढे करणे की ही मुले-मुली विद्यापीठ, शाळा,किंवा कुठ्ल्य्याही शिक्षण वा क्रीडा वा इतर संस्था असतील जिथे होणा-या भेदभावाने किंवा मानाहानीने खचून जाऊ नयेत. रोहित व कन्हैया हे दोघे अतिशय गरीब अशा शेतमजूर, कष्टकरी, दलित-बहुजन कुटुंबातून येतात, रोहितची आईच त्याची सर्वार्थाने पालक. त्यामुळे तिचा लढा हा एका दलित एकाल महिलेचा आहे. अशावेळी अशा कष्टकरी, श्रमिक आई ला फक्त शाब्दिक पाठिंबा नको , भावनिक, मानसिक सोबत, आर्थिक हातभार की तिला न्यायालयीन लढाई करण्याचे बळ येईल.  
मला स्वत:ला रोहितच्या आई ला प्रत्यक्ष भेटता आले नसले आणि हैदराबाद ला  इतक्यात जाता आले नसले तरी नुकतेच माझे गोगू श्यामला या प्रसिद्ध दलित तेलुगु लेखिकेशी बोलणे झाले. ती अन्वेशी या स्त्री संशोधन केंद्रामध्ये काम करत  असून  सुजाता सुरेपल्ली या करीम नगर येथे सातवाहन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. या दोघींनी  पुढाकार घेऊन अन्वेशी या संघटनेच्या सोबत Women’s SolidarityNetwork उभे केले. यात तेलंगणा मधील विविध स्त्री संघटना, पुरोगामी व डावे पक्ष, विद्यार्थी संघटना , एन. जी.ओ , तसेच नागरिक व मानवी हक्क संघटना, विविध शैक्षणिक संघटना तसेच प्राध्यापक वर्ग, स्त्री अभ्यास केंद्र यातील स्त्री प्रतिनिधींचा समावेश आहे. या नेटवर्क द्वारे रोहित सारख्या अन्य विद्यार्थ्यां च्या केसेस हाताळण्यासाठी एक स्वतंत्र कमिशन विद्यापीठ पातळीवर नेमण्यात यावे या संदर्भात  न्यायालयाला  ८७ प्राध्यापकांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात कोर्ट केसेस साठी विद्यार्थ्यांना विशेषत: दलित-बहुजन आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यास  बुडवून ज्या प्रकारे तारखांना हजर राहणे, फेलोशिप ची रक्कम फी भरण्याच्या वेळी हाती न येणे किंवा टर्म संपली तरी ठराविक तारखेपर्यंत पैसे हाती न येणे, प्रशासनाचे विद्यार्थ्यांशी गैर वर्तन इत्यादी संदर्भात पण शिफारशी टाकण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्वेशी ची सुनीता हिने दिली. एकीकडे देशभरात अगदी केरळ , तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, प.बंगाल, ओरिसा, छत्तीसगढ, झारखंड, आसाम, मणिपूर, नागालंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तराखंड, जम्मू/काश्मीर  इत्यादी अनेक राज्यांमधून दलित-बहुजन संघटनांनी च नव्हे तर  विविध विद्यार्थी संघटनांनी,  जनआंदोलनानी पाठिंबा दिला.
खरे तर ज्या  नियोजित पद्धतीने या वंचित जाती  समुहातील  हुशार विद्यार्थ्यांवर दबाव आणून मानसिक, भावनिक, शैक्षणिक, आर्थिक, छळ करण्यात येतोय. त्याची कारणे पण शोधायला हवीत.    दलित, आदिवासी, कष्टकरी, कारागीर, obc व गरीब मुस्लीम यामधील पहिली पिढी जरा लक्षणीय संख्येत उच्च शिक्षणात आढळू लागली आहे. तरीसुद्धा आकडेवारी असे सांगते की अजूनही दलित मुला-मुलींची २.२४% एवढीच संख्या उच्च शिक्षणात आहे, पण त्यांची हुशारी, बुद्धिमता इतर तथाकथित जातीतील विद्यार्थ्यांना सहन होता नाहीये. त्यांचे सर्व विद्यार्थ्याम्न्मध्ये लोकप्रिय होणे. एक नेतृत्व म्हणून उभे राहणे, अंधश्रद्धा व धर्मांधातेवर त्यांनी केलेले तर्कनिष्ठ व बौद्धिक टीका ज्या  परंपरावादी  पक्षीय, संघिष्ट ताकादिम्ना सहन होत नाहीये, ते या मागे आहेत हे आता एकदम स्पष्ट आहे. प्रवेश मिळण्यापासून ते विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी व समकक्ष असणा-या त्यांच्या सह विद्यार्थ्यांकडून दलित-बहुजन व आदिवासी मुलांना अस्पृश्यतेची वागणूक मिळते हा सार्वत्रिक अनुभव आहे. अजूनही परिस्थिती बदललेली नाही. अशावेळी ज्यांना प्रवेश मिळतो त्यांच्या समस्या सुटल्या आहेत, असा त्याचा अर्थ नाही.  त्यातूनच रोहित  सारख्या मुलांना आत्महत्ये  पर्यंतचे टोक गाठावे लागले किंवा त्यांच्या मृत्युला आत्महत्येचा रंग देण्यात आला , याचे कारण जातीय राजकारण आहे. त्यांचे दलित , बहुजन, आदिवासी असणे हाच त्यांचा दोष आहे हे सिद्ध झाले आहे कारण रोहितच्या आधी याच विद्यापीठात झालेल्या ९ आत्महत्या केल्या गेल्या ज्यातील ८ विद्यार्थी दलित असून त्यातील १विद्यार्थी  ओबीसी होता. त्यातही दलित विद्यार्थ्याना छळण्याचे प्रमाण अधिक आहे.
फुले-आंबेडकरी विचारांची मुले आत्महत्या करण्या इतकी कशी हतबल होऊ शकतात , असा प्रश्न दलित-बहुजन –आदिवासी चळवळीतील अनेकांना पडला. म्हणूनच या आत्महत्या की हत्या? sc/st अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू करण्याची  मागणी म्हणूनच पुढे येतेय. कारण लागोपाठ फक्त एका विशिष्ट जात सामुहातील्च विद्यार्थी आत्महत्या करताहेत हे  संशयास्पद आहे व कुठल्याही शिक्षण संस्थेला  लांछनास्पद आहे. पण गोगू श्यामला या दलित लेखिकेने उभे केलेले वास्तव अतिशय गंभीर असून याबाबत चिंतनाची गरज आहे. रोहितचा बाप ओ बी सी आहे हे कळल्यावर शासनाप्रमाणेच काही दलित व्यक्ती सुद्धा रोहितची  आई  जन्मत: दलित  असूनही तिची मुले दलित कशी नाहीत हे सिद्ध करण्यातच पुढाकार घेऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. इथे दलित पितृसत्ता ब्राह्मणवादी पितृसत्तेचे अनुकरण करीत आईच्या योनी पेक्षा पुरुषाच्या बीजाला महत्व देत बापाचेच मूल आहे , असा दावा करीत आहे.
मला कळत नाही एकीकडे भारत माता म्हणत आपण देशाला मातेचा दर्जा देतो म्हणणारे  प्रत्यक्ष मातांना काहीच कसा दर्जा देत नाहीयेत?
 दुसरे असे की या माता  गरीब, वंचित , संसाधन हीन असून त्या व्यवस्थेशी टक्कर देत मुलांच्या माध्यमातून आपले जीवन उंचावणार अशी अपेक्षा करीत आहेत. त्या शिक्षित नाहीत, असल्या तर निरक्षर किंवा अर्ध शिक्षित अशा वेळी त्या सरसर वरती सरकणा-या नव्याच जगाला आपल्या समोर आणणा-या मुला-मुली कडे ही आई कुतूहलाने बघते, तिला आजुबाजू च्या घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करताना दिसणा-या  काही वस्तू उदा. टी व्ही., फ्रीज, सारखी साधने (secondhand) जरी घेता आली तरी आपला स्तर उंचावला आहे, असे वाटते. पण मुले नेमकी काय शिकताहेत, त्यांचे विचार काय, त्यांची स्वप्ने इतकी वेगळी कशी? ती विद्यापीठामध्ये राहतात तेव्हा त्यांचा कुणाशी संवाद होतो, आपल्या या जगापेक्षा ते जग किती वेगळे आहे, हे कळते तेव्हा सर्वच पालकांमध्ये आणि विद्यार्थी असणा-या होस्टेल वर राहणा-या पाळ्यांमध्ये खूप अंतर असते. पण दलित-बहुजन, आदिवासी व मुस्लीम आया ब-याच वेळी निरक्षर असतात आणि त्यांना हे अंतर पार करणे खूप कठीण होते. या शिक्षणाने आपले मुल आता आपल्या सारख्या कष्ट करणा-या आई-वडिलांची ओळख सुद्धा त्याच्या मित्र मैत्रिणींना करून देईल का या बद्दल साशंक असतात. तर या वंचित समाजातील सुशिक्षित पालक मुलाना हळूहळू ब्राह्मणवादी, चंगळवादी, शिक्षण व्यवस्थेचेच स्वप्न देत असल्याने बहुतेक सर्व मुला मुलीना सायन्स किंवावा कॉमर्स ला जायचे असते, बहुतेकांना आता इंजिनिअर व्हायचे असते, मिडीयात जायचे असते . या सर्व शिक्षणाला भरपूर पैसा लागतो. खाजगी महाविद्यालये वाढत चालली आहेत. पैसा व उच्च जात असणा-यांना मेरीट नसले तरी प्रवेश मिळतो. पण इथे कष्ट करूनही अभ्यासासाठी घरात विजेचा दिवा नसेल तरी मिळवलेले गुण रिझर्वेशन मध्ये सुद्धा मेरीट लिस्ट नुसार  असतात हे अनेकांना समाजात नाही. म्हणजे पैसा कमावून आई वडिलांचे कष्ट कमी करून आपल्या भावंडा च्या शिक्षणा साठी बचत करायची असते.
या दलित –बहुजन-आदिवासी मुलांना आरक्षण मिळाले म्हणून ते इथवर पोचलेत असा एक सर्व साधारण समज असतो. ही मुले इतर मुलांपेक्षा विविध प्रकारचे कष्ट करून इथवर पोचली असतात, बाकी उच्च जाती व उच्च मध्यम वर्गीय मुलांवर अशी क्वचितच कष्टाची कामे करण्याची जबाबदारी येते, उदा. मैला वाहण्याचे, कचरा वेचण्याचे काम करून मुले शाळेत येतात, ५ की.मी.दूर पाणी शोधात जाऊन खोल गेलेले पाणी शेंदून घरी घागरी भरून ठेवल्यावर, गुरांना चारा घालून त्यांचे मलमूत्र काढल्यावर, आई बरोबर शेतात , किंवा घरकामात म्बारोबारीचा वाटा उचलून कितीतरी मुलि शाळेत पोचतात, हॉटेल किंवा बस थांबा, कोळसा भट्टी वा विटा भट्टी, कधी लोखंडी काच पत्रा तर कधी पेट्रोल पंप वर काम करणारी ही मुले जेव्हा आपल्या शाळा पार करून उच्च शिक्षणासाठी वरती पोचतात तेव्हा ते त्यांच्या अंगाला येणारा वास व त्यांच्या जात, धर्म गरिबीमुळे हेटाळणीचा विषय बनतात. श्रम व घामाच्या  जोरावर जर सर्व विद्यापीठात प्रवेश मिळत असता तर संपूर्ण पांढरपेशा कामचोर वर्गाला कष्टकरी सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा  श्रम कसे करतात या चे  कोचिंग घ्यावे लागले असते. कारण पांढरपेशा वर्ग विशेषत: त्यातील पुरुष शारीरिक श्रम व संगोपनाच्या सर्व जबाबदा-या पूर्णपणे विसरला आहे. श्रमिकांच्या सोबत बरोबरी करण्यासाठी त्यांना वेगळेच रिझर्वेशन मागावे लागले असते. कारण कष्ट हे संपूर्ण कौशल्याचे काम आहे. त्यासाठी जी जैविक शारीरिक ताकद लागते त्यापेक्षाही अधिक लागते नियोजन व कौशल्य.  त्यामुळे त्यांना फक्त पुस्तकी बौद्धिक शिक्षणाची जोड हवी आहे व ती त्याना मिळू नये म्हणून त्याना शुद्रातीशुद्र ठरवून नाकारण्यात आले होते. स्वातन्त्र्यानंतर या परिस्थितीत थोडा फरक पडू लागला तो आरक्षणामुळे. पण हे आरक्षण अनेकाना खटकू लागले.
पण कष्टकरी घरातील मुले-मुली जेव्हा शिकतात तेव्हा ते इतर मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक जबाबदार-या उचलतात, ही वस्तुस्थिती आता सर्व सवर्ण मध्यमवर्गीयाना समजावण्याची सुद्धा गरज आहे. ते दलित-बहुजन आहेत म्हणून त्याना गरीब ठेवण्यात आले आहे. म्हणून त्यांचे रोजी-रोटी कमावण्याचे,आजीविकेचे प्रश्न थोडे कमी झालेत तर ते अभ्यासाला अधिक वेळ देऊ शकतील, म्हणून आरक्षण आहे. . शिक्षणाला लागणारी पुस्तके व साधने विकत घेता यावीत, त्याना फी परवडत नाही म्हणून सवलत अशा रुपात आरक्षण मिळत असते. ज्यावेळी मुलीना शिक्षण व राजकारणात आरक्षण मिळू लागले तेव्हा त्यांच्या मध्ये लक्षणीय प्रगती झाली हे वास्तव आहे. तरी आरक्षण हे  मेरिट विरोधी असे मानणा-यांमध्ये स्वत: उच्च जातीतील स्त्रियां व पुरुषांचा समावेश आहे. मेरीट हे फक्त शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षेवर न ठेवता आजीविकेसाठी व समाजातील भेदभाव मानहानी, घरातील ताणताणाव यातूनही मार्ग काढत जि मुले शिक्षण घेतात त्यावर पण गुणवत्ता चाचणी असेल तर श्रमाच्या  पातळीवरचे मेरीट कुणाला द्यावे लागेल ?
रोहितच्या मृत्यू नंतर हे प्रश्न फक्त राजकीय किंवा शैक्षणिक राहिले नसून हे मुळात समाजाची मानसिकता न बदलल्याचे द्योतक झाले आहे, हे लक्ष्यात येते. ते या समाजाचे मानसशास्त्रीय आकलन केल्याशिवाय व त्यांच्या मेरीट व आरक्षणाबद्दल  अवास्तव व अतार्किक समाजाचे निराकरण केल्याशिवाय आता सुटणार नाहीत.
बरे सर्वसामान्य जातीयवादी आकस ठेवतात हे समजू शकते, पण डावे पुरोगामी ज्यांनी मार्क्स समजून घेतला तेही जास्तीत जास्त उच्च जाती तील असल्याने ते आदिवासी व कामगारांबद्दल कार्य करायला उत्सुक होते, आहेतव असतात. पण ते दलित व बहुजन जातीतील लोकांबरोबर जात वास्तव व त्यावर आधारित समस्यांबाबत काम करण्यापेक्षा त्यांना  कारागीर, शेतकरी, शेतमजूर, कामगार असे घटक ठरवून त्यांच्या आर्थिक प्रश्नावर काम करतात. असंघटीत  क्षेत्रातील, वंचित अशा समुहाचे नेतृत्व आपस्दुकाच्घ त्यांच्याकडे येते. मग या पुरोगामी संघटनातही केवळ जातीच्या जोरावर पुरोहीतगिरी मिळू शकते. तसेच दलित-बहुजन मानसिकता ही अभिनया कांबळे म्हणतात त्याप्रमाणे ब्राह्मणी चात्राच्हायेत राहणे व त्यांच्याकडून पावती मिळण्याची सवय झालेली असल्याने ज्या थोड्या डाव्यांनी, समाजवाद्यांनी जातीच्या प्रश्नाबाबत लिहिले, ते बोलू लागले, दीक्षा वगैरे घेऊ लागले त्याना इतके डोक्यावर घेतले की आता जातीच्या प्रश्नाबाबतही त्यांचे आकलन महत्वाचे मानले जाते. आजकाल याच समीक्षा लक्ष्यात घेऊन अभ्यास व संशोधास्न करण्याचा आग्रह धरला जातो.  अगदी गेल्या दशका पर्यंत जाती चा प्रश्न वर वरचा मानला गेला होता. आता त्यांच्या पक्षात व  वैचारिक पातळीवर मान्यता मिळाल्यावर व त्यांच्यासाठी परदेशातील अभ्यासक्रमात बहिष्कृत व वंचित घटकांवर केलेल्या अभ्यासाना फेलोशिप मिळते हे लक्ष्यात आल्यावर आज अनेक डावे अभ्यासक दलित-बहुजन लोकांबरोबर जाती प्रश्ना संदर्भात बोलू लागले व त्यांच्या वतीने मांडू लागले. म्हणजे दलित-बहुजन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हेच फेलोशिप घेतात. यांची आडनावे बघितली तर जवळपास बहुतेक उच्चजातीचेच आहेत.
 तर दुसरीकडे त्याच सुमारास अनेक संघिष्ट ही आता  बाबासाहेबांचा, जोतीराव –सावित्रीबाईचा  पुळका आल्यासारखे व ते आमचेच नेते असे दाखवू लागलेत व समरस होण्याची भाषा बोलू लागलेत.  एकीकडे मनुस्मृतीतील मुल्ये आणायची आणि दुसरीकडे संविधान तुडवायचे.  जे जे फुले आंबेडकर वादी व मार्क्सवादी आहेत त्यांच्या वर, त्यांच्या धर्मनिरपेक्ष मुल्यांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले चढवीत आहेत. म्हणजे हल्ला चढविणारे पण ब्राह्मण वादी व वंचितांच्या वतीने बोलणारे सुद्धा उच्च जातीचेच प्रतीनिधी. दोन्ही बाजूला तेच पुरोहित, ठेकेदार व दलाल.
पण आताचे तरुण मुले-मुली हा कावा लवकर ओळखताहेत. म्हणून खरोखर जे सोसताहेत त्याच वर्गातून मुले-मुली प्रतिनिधी म्हस्नून बोलू लागले आहेत. रोहित अशाच संवेदनशील मुलांचा प्रतिनिधी होता. त्याला भेदभावाचे राजकारण कळून चुकले होते. असे सर्व बाजूनी आपल्या प्रतिभेला डावलून फक्त ब्राह्मण व उच्चजातीतील लोकाना सर्व नोक-या व संधी दिल्या जाता आहेत हे बघून ही मुले निराश होतात. अस्वस्थ होतात. त्या अस्वस्थ क्षणांना त्यांच्याजवळ कुणी नसते. 
पण आता या देशातील तळागाळातील आई-बहिणी आपल्या मुलांच्या, भावांच्या संरक्षणार्थ व  सुरक्षिततेसाठी उभ्या रहात आहेत. आज देशात जे काही चालले आहे त्याने सर्वात जास्त स्त्रियांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यातही दलित-बहुजन आदिवासी आणि अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लीम स्त्रियांचे जगणे अधिकच हलाखीचे होऊ लागले आहे.
पण तरीही या व अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला त्यांना सहकार्य करायला हवे  म्हणून दलित बहुजन –आदिवासी व अल्पसंख्यांक समूहातील स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन देशभरात वेगवेगळे मंच स्थापन केलेत. आपली युवा पिढी खचून जाऊ नये म्हणून तसे काही कार्यक्रम घेतलेत. व बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्या सर्व देशभरात असे एक नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आता दलित-बहुजन स्त्रीवादी कार्यकर्त्या एकत्र येत आहेत याचा उल्लेख वरती केलाच. गेल्या ४ महिन्यात अनेक घडामोडी झाल्या. आता राधिका वेमुल्ला मुंबईतील चैत्यभूमीवर बुद्ध धम्म दीक्षा घेउन पूर्ण देशभर आंबेडकरांचे व बुद्ध धम्म विचार पसरविण्यासाठी पण प्रतिबद्ध झाल्या आहेत. सोबतच नागपूर, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी महाराष्ट्रात आता अशा प्रकारे तरुणाईला मानसिक व भावनिक  दृष्ट्या सक्षम करण्यासाठी  संघटन बांधणी सुरु झाली आहे. प्राध्यापक अभिनया कांबळे व मी लता प्रतिभा मधुकर अशा आम्ही दोघींनी मिळून मुंबई व पुणे येथे ‘अम्मा ‘ नावाचे नवे संघटन सुरु केले असून confront नावाचे एक मासिक अभिनया संपादित करतात त्यातून अशा तरुणाई सोबत संवाद करणारे सदर सुरु होत आहे. या संघटनेमार्फत पहिल्यांदा आपल्या मुलाना आत्महत्ये च्या विचारांपासून दूर करणे,  न्युनगंडातून बाहेर काढणे, त्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करणे असे प्रयत्न केले जातील. आत्मविश्वास व स्वसंमानाची ही चळवळ असेल. नागपुरात छाया खोब्रागडे यांनी रोहितच्या आईच्या समर्थनार्थ संबुद्ध महिला संघटनेमार्फत सर्व स्त्री संघटनाचे नेटवर्किंग करण्यात पुढाकार घेऊन त्या ठिकठिकाणी सभा व परिषदांचे आयोजन सुरु केले आहे. नूतन माळवी वर्धा येथे अशा प्रकारचे प्रबोधन तिच्या सत्यशोधक महिला परिषदेतर्फे करते आहे.
फुले- आंबेडकर यांचा आदर्श ठेवणारी तरुणाई विफल नाही सफल होणार
कारण ज्यांना फुले-शाहू-आंबेडकर -पेरियार  चे विचार माहिती आहेत, ज्यांनी या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्या सर्वांना पहिली गोष्ट ही माहिती हवी की आजवर यापेक्षाही तुच्छतेने व क्रूरतेने समाज शूद्रातीशूद्रांशी वागला आहे. त्याच्याशी टक्कर देत आलेत आपले पूर्वज , पण ते अज्ञानी होते. हे सर्व एका बाजूला उतरंड ठेवत त्यात जन्मत:उच्च व नीच जाती ठरवत एकाला कुठ्ल्य्याही कर्तृत्वाशिवाय श्रेष्ठत्व बहाल तर एकाला कुठलाही गुन्हा केला नसताना अस्पृश्य ठरवणारी व्यवस्था निसर्ग वा देव निर्मित नसून ते एक ब्राह्मणवादी षडयंत्र आहे असे महात्मा जोतीराव फुलेंनी सोदाहरण दाखविले. आंबेडकरांनी ती व्यवस्था नाकारून त्याच्या अगदी उलट अशी समानता व समता आधारित प्रत्येकाला स्वातन्त्र्याचा हक्क असणारी व्यवस्था संविधाना द्वारे आणली. या संविधानाधारीत लोकशाही व्यवस्थेने बहाल केलेले हक्क इतक्या सहजासहजी हे वर्षानुवर्षे सत्ता उपभोगलेले लोक आपल्याला  आपले हक्क मिळू देणार नाही हे नव्या पिढीतील तरुणाई ला समजवण्यात कुठेतरी आपण कमी पडलो की काय असे वाटू लागले. एकीकडे संघर्ष करण्याची तयारी, शिक्षणाची अपार जिद्द आणि त्यासाठी अभ्यास व अवांतर सुद्धा भरपूर वाचून ज्ञान संग्रह करण्याची लालसा असणारे तरुण-तरुणी आज कोणत्या अशा गोष्टींनी खचत आहेत, का त्याना नैराश्य येत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे असे वाटल्याने आजवर दलित-बहुजन-आदिवासी व अल्पसंख्यांक अशा वंचित विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संवाद करणारे संघटन तयार झाले नाही . या मुलांना व्यावसायिक मार्गदर्शना सोबतच सामाजिक व सांस्कृतिक वास्तव, चढाओढ, एक विषय बंद झाला तरी असंख्य दालनं अभ्यासासाठी उघडी असतात हे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सर्वानीच mpsc/upsc देऊन सरकारी नोक-या केल्या पाहिजे असा आग्रह धरणे, इंजिनिअर, वकील, डॉक्टर च होण्याची गरज नसून अनेक दलित तरुण तरुणी उत्तम entrepreneur म्हणजेच उद्योजक, व्यावसायिक, कारागीर, व आज च्या computer च्या काळात सोशल नेटवर्किंग च्या आधारे तर किती प्रकारचे व्यवसाय ते करू शकतात हे सांगणे महत्वाचे आहे.
या पार्श्वभूमीवर मला आपल्या महाराष्ट्रातील अशी काही तरुण मुले आठवताहेत की त्यांना नक्षलाइट ठरवून तुरुंगात डांबण्यात आले आहे. मग सचिन असो की सुधीर. पण त्यांची जिद्द तशीच कायम  आहे. शीतल साठे आपल्या छोट्या बाळाला घेऊन शाहिरी जलसे करते आणि सावित्री ज्योती, भीमाला सलाम करीत सचिनने लिहिलेली गीते गात अनेकांची प्रेरणा बनते आहे, तेव्हा तिच्या दुर्दम्य साहसाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही. छत्तीसगड च्या सोनी सोरी ची जिद्द काय सांगावी? तुरुंगात हालअपेष्टा सहन करून बाहेर पडल्यावर तिच्या चेहे-यावर भयानक रसायन टाकून तिचा चेहेरा जाळण्यात आला. तशाही अवस्थेत ती कणखरपणे उभी आहे. इरोम शर्मिला एक मणिपूरची आदिवासी स्त्री, पुन्हा आमरण उपोषण करत, लष्करशाही ला आव्हान करीत, आर्म फोर्र्सेस मागे घ्या म्हणत अहिंसक लढाई लढतेय. रोहित वेमुलानंतर देशभरातून जागृत व संघटीत झालेली तरुणाई, त्याचे आंबेडकर विद्यार्थी संघटनेतील दोन्ता प्रशांत व इतर तरुण साथी-विद्यार्थी, कन्हैय्या, उमेर,  अनिर्बान व शेहेला रशीद ही  आजच्या तरुणांची प्रेरणास्थाने ही आहेत.  ते देशद्रोही नसून या देशाला ख-या अर्थाने लोकशाहीवादी व समतावादी राष्ट्र करण्यासाठी धडपड करीत आहेत. साम्राज्यवादाच्या विळख्यातून मुक्त करायला धडपडणारी ही मुले भीमाने दिलेल्या  संविधानावर व मानवी हक्क आणि मानवतेवर विश्वास असणा-या या तरुणांना गरज आहे एका सुजाण पालकत्वाची. सामाजिक पालकत्वाची. त्यांच्या पाठीमागे वैचारिक व कृतीच्या पातळीवर खंबीरपणे उभे राहण्याची.तर असे आश्वस्त करणारी एक वैचारिक पालकत्वाची चळवळ दलित-बहुजन स्त्री कार्यकर्त्या रुजवू बघताहेत. १२५ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबाना ही एक आगळीवेगळी आदरांजली आहे. सावित्री-जोती, भीम-रमाई असे पालक जागोजागी या मुलाना आधार स्तंभासारखे उभे राहोत असा हा दलित-बहुजन स्त्रियांचा देशव्यापी एल्गार आहे.
लता प्रतिभा मधुकर
संशोधक, लेखक व  सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता 















No comments: